Join us

₹८ लाखांच्या होम लोनवर ४% ची व्याजाची सबसिडी, मध्यम वर्गीयांसाठी मोदी सरकारचं गिफ्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2024 12:11 PM

या अंतर्गत शहरी गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबांसाठी १ कोटी घरं बांधली जाणार आहेत. जाणून घेऊ काय आहे सरकारचा प्लॅन.

PM Awas Yojana-Urban 2.0 Scheme: केंद्र सरकारनं पंतप्रधान आवास योजना-शहरी (पीएमएवाय-यू) २.० ला मंजुरी दिली आहे. या अंतर्गत शहरी गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबांसाठी १ कोटी घरं बांधली जाणार आहेत. या १ कोटी कुटुंबांसाठी २.३० लाख कोटी रुपयांचं सरकारी अनुदान देण्यात येणार आहे. हे अनुदान वेगवेगळ्या पद्धतीनं दिले जाणार आहे. असाच एक मार्ग म्हणजे व्याज अनुदान योजना. चला जाणून घेऊया या प्लॅनबद्दल.

योजनेंतर्गत कोणाचा समावेश?

या योजनेत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक (EWS)/अल्प उत्पन्न गट (LIG)/मध्यम उत्पन्न गट (MIG) कुटुंबांचा समावेश आहे. ही अशी कुटुंबं आहेत ज्यांचं देशात कुठेही स्वत:चं पक्कं घर नाही. असे लोक पीएमएवाय-यू २.० अंतर्गत घरे खरेदी किंवा बांधण्यास पात्र असतील.

  • EWS अंतर्गत समाविष्ट : वार्षिक उत्पन्न ३ लाख रुपयांपर्यंत असलेली कुटुंबं
  • LIG अंतर्गत समाविष्ट : वार्षिक उत्पन्न ३ लाख ते ६ लाख रुपयांपर्यंत असणारी कुटुंबं.
  • MIG अंतर्गत समाविष्ट : ६ लाख ते ९ लाख रुपयांपर्यंत वार्षिक उत्पन्न असणारी कुटुंबं. 

व्याज सबसिडी योजना

ईडब्ल्यूएस, एलआयजी आणि एमआयजी कुटुंबांना होमलोन वर सबसिडी देण्यात येणार आहे. ३५ लाखरुपयांपर्यंतच्या घरासाठी २५ लाख रुपयांपर्यंत होमलोन घेणाऱ्या लाभार्थ्यांना १२ वर्षांपर्यंतच्या कालावधीसाठी ८ लाख रुपयांच्या पहिल्या कर्जावर ४ टक्के व्याज अनुदान मिळणार आहे. पात्र लाभार्थ्यांना पाच वार्षिक हप्त्यांमध्ये पुश बटनद्वारे १ लाख ८० हजार रुपयांचं अनुदान देण्यात येणार आहे. लाभार्थी वेबसाइट, ओटीपी किंवा स्मार्ट कार्डद्वारे त्यांच्या खात्याचा तपशील मिळवू शकतात.

पंतप्रधान आवास योजना-शहरी २०१५ मध्ये सुरू करण्यात आली. या योजनेअंतर्गत १.१८ कोटी घरांना मंजुरी देण्यात आली होती. त्यापैकी ८५.५ लाखांहून अधिक घरं पूर्ण करून लाभार्थ्यांच्या ताब्यात देण्यात आली असून उर्वरित घरांचं बांधकाम सुरू आहे.

टॅग्स :पंतप्रधानसुंदर गृहनियोजन