नवी दिल्ली : सरकारने घोषणा करून दीड महिना उलटला तरी २०१९ - २० या वित्त वर्षाचे ‘कर्मचारी भविष्य निधी’चे (ईपीएफ) व्याज ४० लाख सदस्यांना अजूनही मिळालेले नाही. या सदस्यांची केवायसी पूर्तता नसल्यामुळे व्याज जमा करण्यात आले नसल्याचे सुत्रांनी सांगितले.
व्याज न मिळालेल्या कर्मचाऱ्यांच्या रोजगारदाता संस्थांशी कर्मचारी भविष्य निधी संघटनेच्या (ईपीएफओ) क्षेत्रीय कार्यालयांकडून संपर्क करण्यात येत आहे, असे सुत्रांनी स्पष्ट केले.
वित्तीय वर्ष २०१९ - २०चे ईपीएफ व्याज ३१ डिसेंबर २०२०पूर्वी सदस्यांच्या खात्यावर जमा केले जाईल, असे ईपीएफओने जाहीर केले होते. या वर्षासाठी ८.५ टक्के दराने व्याज देण्यात येत आहे. ईपीएफओचे सहा कोटी सदस्य आहेत. दोन टप्प्यांऐवजी सर्वांना एकाच टप्प्यात व्याज देण्याची घोषणाही ईपीएफओने केली होती. तथापि, अजून सुमारे ८ ते १० टक्के सदस्यांना व्याज मिळालेले नाही.
ईपीएफच्या व्याजासंबंधीची घोषणा करताना केंद्रीय श्रममंत्री संतोष गंगवार यांनी एका व्हिडिओ संदेशात म्हटले होते की, २०१९ - २०साठी ८.५ टक्के दराने व्याज देण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासंबंधीची अधिसूचना आम्ही जारी केली आहे. सदस्यांच्या खात्यावर व्याज जमा करण्याची प्रक्रियाही सुरू करण्यात आली आहे. संस्थांकडून भविष्य निर्वाह निधी जमा केला जात असल्याने त्यांनी आपापल्या कर्मचाऱ्यांकडून केवायसीची पूर्तता करण्याचे आवाहन ईपीएफओ कार्यालयाने केले होते. त्यासाठी मोहीमही उघडण्यात आली होती. त्यानंतरही हे निदर्शनास आले आहे.
आतापर्यंतचे सर्वात कमी व्याज
२०१९ - २०साठी देण्यात आलेला ८.५ टक्के व्याज दर आजपर्यंतचा सर्वांत कमी व्याज दर ठरला आहे. २०१८-१९मध्ये देण्यात आलेल्या ८.६५ टक्के व्याज दरापेक्षा तो ०.१५ टक्क्यांनी कमी आहे. व्याज अदा करण्यासाठी ईपीएफओला एकूण ६०,७०० कोटी रुपये लागणार आहेत.