Join us

इंडिगोची आणखी ४० विमाने जमिनीवर? एकूण ८० विमानांना फटका, तिकिटे महागणार

By ऑनलाइन लोकमत | Published: December 16, 2023 6:17 AM

देशातील सर्वात मोठी विमान कंपनी असा लौकिक असलेल्या इंडिगो कंपनीच्या अडचणीत लवकरच वाढ होणार असून जानेवारीमध्ये कंपनीची आणखी किमान ४० विमाने जमिनीवर स्थिरावण्याची शक्यता आहे.

मुंबई : देशातील सर्वात मोठी विमान कंपनी असा लौकिक असलेल्या इंडिगो कंपनीच्या अडचणीत लवकरच वाढ होणार असून जानेवारीमध्ये कंपनीची आणखी किमान ४० विमाने जमिनीवर स्थिरावण्याची शक्यता आहे. यापूर्वी याच वर्षात कंपनीची ४० विमाने इंजिनमधील बिघाडामुळे जमिनीवर स्थिरावली आहेत. सध्या विमान प्रवाशांच्या संख्येत विक्रमी वाढ होत आहे. त्यात जर विमानांची संख्या कमी झाली तर याचा थेट परिणाम विमान तिकिटांचे दर वाढण्याच्या रुपाने दिसणार आहे.

इंडिगोच्या ताफ्यात एकूण ३३० विमाने आहेत. या माध्यमातून देशातील बहुतांश विमानतळांवर कंपनीची सेवा सुरू आहे. तर परदेशातही काही ठिकाणी कंपनीची विमाने उड्डाण करतात. गेल्या मे महिन्यात गो-फर्स्ट कंपनीच्या ताफ्यातील ५६ पैकी २५ विमाने इंजिनात बिघाड झाल्यामुळे जमिनीवर स्थिरावली होती. त्यानंतर विमानांची संख्या कमी झाल्यामुळे तिकीट दरात वाढ झाली होती. त्यात आता इंडिगोच्या विमानांची भर पडणार आहे. कंपनीच्या विमानांचे इंजिन हे प्रॅट अँड व्हिटनी या कंपनीची आहेत. या इंजिनमधील तांत्रिक दोषाचा फटका केवळ जगातील अनेक विमान कंपन्यांना बसला आहे.

टॅग्स :इंडिगो