भारतातील सर्वात मोठी एडटेक कंपनी बायजूस (Byju's) पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणावर कर्मचारी कपात करण्याच्या विचारात आहे. कंपनी मोठ्या प्रमाणावर रिस्ट्रक्चरिंग करण्याची तयारी करत आहे. त्यामुळे पुन्हा एकदा मोठी कर्मचारी कपात होणार आहे. बायजूस यावेळी ४ हजार लोकांना काढून टाकण्याची योजना आखत आहे. आता यावर कंपनीच्या नव्या इंडिया सीईओंचंही वक्तव्यही समोर आले आहे.
काय म्हटलंय कंपनीनं
मोठ्या प्रमाणात कंपनीतून कर्मचाऱ्यांची कपात करण्यावर बायजूसनंही प्रतिक्रिया दिली आहे. आम्ही ऑपरेशनल स्ट्रक्चर सुलभ करण्याचा आणि खर्चाचा आधार कमी करण्याचा विचार करत आहोत. उत्तम कॅश फ्लो मॅनेजमेंटसाठी व्यवसायाची पुनर्रचना केली जात आहे आणि ती आता अंतिम टप्प्यात पोहोचली आहे, असं कंपनीनं म्हटलंय. बायजूचे नवे इंडिया सीईओ अर्जुन मोहन पुढील काही आठवड्यांत ही प्रक्रिया पूर्ण करणार आहेत, असंही सांगण्यात आलंय.
रिस्ट्रक्चरिंगची सुरूवात
या प्रकरणाची माहिती असलेल्या लोकांचे म्हणण्यानुसार अर्जुन मोहन यांनी कंपनीमध्ये मोठ्या प्रमाणावर रिस्ट्रक्चरिंग करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे, ज्यामुळे ४०००-५००० नोकऱ्या कमी होऊ शकतात. या कपातीमुळे Byju च्या ऑपरेटिंग युनिट थिंक अँड लर्न प्रायव्हेट लिमिटेडच्या (Think and Learn Private Limited) भारतात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांवरही परिणाम होण्याची शक्यता आहे. याशिवाय आकाशच्या कर्मचाऱ्यांचाही यात सहभाग असेल, असंही सूत्रांचं म्हणणं आहे.
कंपनीच्या लोकांना दिली माहिती
मोहन यांनी कंपनीच्या लोकांना या प्रकरणाची माहिती दिली आहे. कंपनीत होणाऱ्या कर्मचारी कपातीमुळे विक्री आणि विपणनावरही परिणाम होणार आहे. ही कपात अशा वेळी होत आहे जेव्हा एडटेक युनिकॉर्न स्वतःच रोख संकटाचा सामना करत आहे. कंपनीनं कार्यालयाची जागाही सोडली आहे. याशिवाय, बायजू आपल्या उपकंपन्या विकण्याची शक्यता देखील शोधत आहे. याशिवाय कंपनी बाहेरुन निधीही उभारत आहे. कंपनीनं याआधीही अनेकदा कर्मचारी कपात केली आहे.