नवी दिल्ली : चीनमधील सॅनी हेवी इंडस्ट्रीज या कंपनीच्या नेतृत्वाखाली तब्बल ६00 कंपन्या भारतात ८५ अब्ज डॉलरची गुंतवणूक करण्यास उत्सुक असून, त्यातून येत्या पाच वर्षांत ७ लाख नोक-या निर्माण होतील. चीनमधून सर्वाधिक ४२ टक्के गुंतवणूक प्रस्ताव आले आहेत. २४ टक्के प्रस्ताव अमेरिकेतून, तर ११ टक्के ब्रिटनमधून आले आहेत.
भारतातील विदेशी गुंतवणुकीला प्रोत्साहन देण्यासाठी इन्व्हेस्ट इंडिया ही सरकारी संस्था काम करते. या संस्थेने २00 कंपन्यांची एक यादी तयार केली आहे. भारतात अस्तित्व नसलेल्या कंपन्यांचा यात समावेश आहे. त्या कंपन्यांनी भारतात यावे, गुंतवणूक करावी, असे प्रयत्न जोरात सुरू आहेत. इन्व्हेस्ट इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक दीपक बागला यांनी सांगितले की, येत्या दोन वर्षांत
१00 अब्ज डॉलर विदेशी गुंतवणूक आणण्याचे उद्दिष्ट आम्ही ठेवले आहे. वित्तवर्ष २0१७मध्ये भारताने विक्रमी ४३ अब्ज डॉलरची परकीय गुंतवणूक आणली आहे. आदल्या वर्षाच्या तुलनेत ती ९ टक्के अधिक आहे. या कंपन्यांच्या येण्यामुळे येत्या पाच वर्षांत भारतामध्ये सात लाख नव्या नोकºयांची संधी उपलब्ध होणार आहे.
चीनची सॅनी हेवी इंडस्ट्रीज ही जगातील आघाडीची यंत्रसामग्री उत्पादक कंपनी आहे. ती भारतात ९.८ अब्ज डॉलरची गुंतवणूक करायला तयार आहे. याशिवाय चीनमधीलच पॅसिफिक कन्स्ट्रक्शन, चायना फॉर्च्युन लँड डेव्हलपमेंट आणि डॅलियन वांडा या कंपन्याही गुंतवणुकीस इच्छुक आहेत.
प्रत्येक कंपनी ५ अब्ज डॉलरपेक्षा जास्त गुंतवणूक करण्यास तयार आहे. याशिवाय रोल्स-रॉयस ३.७ अब्ज डॉलरची, तर आॅस्ट्रेलियाची पेर्डमन इंडस्ट्रिज ३ अब्ज डॉलरची गुंतवणूक करण्यास तयार आहे.
आतापर्यंत १ लाख रोजगार
इन्व्हेस्ट इंडियाच्या माहितीनुसार, ७.४३ अब्ज डॉलरची गुंतवणूक यापूर्वीच आली असून, त्यातून १ लाख रोजगार निर्माण झाले आहेत. इन्व्हेस्ट इंडियाच्या पथकाने नुकतीच पंतप्रधानांची भेट घेऊन नव्या प्रस्तावांची माहिती त्यांना दिली, असे बागला यांनी सांगितले.
गुंतवणुकीचे ४२ टक्के प्रस्ताव चीनमधून, ७ लाख जणांना नोक-या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2017 12:39 AM2017-10-17T00:39:45+5:302017-10-17T00:40:21+5:30