नवी दिल्ली : तात्काळ व्हिसा मंजुरी प्रक्रिया अमलात आल्यानंतर देशात येणाऱ्या पर्यटकांच्या संख्येत ४२१.६ टक्के वाढ नोंदली गेली आहे. केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी मंत्रालयाशी संबंधित संसदीय सल्लागार समितीच्या बैठकीत ही माहिती दिली.राजनाथ सिंह म्हणाले, ‘तात्काळ व्हिसा मंजुरीच्या उद्देशाने सरकारकडून विविध सुविधा सुरू करण्यात आल्या आहेत. इलेक्ट्रॉनिक ट्रॅव्हल आॅथरायझेशन (ईटीए) तथा इमिग्रेशन व्हिसा, फॉरेनर्स रजिस्ट्रेशन अँड ट्रेकिंग योजनांची अंमलबजावणी सुरू आहे. ही सुविधा लागू झाल्यानंतर ७५ दिवसांतच ६५,००० व्हिसा जारी करण्यात आले आहेत.’ व्हिसासाठी दररोज सरासरी १,००० प्रवास अर्ज दाखल होत आहेत.डिसेंबर २०१४ मध्ये पर्यटकांचे आगमन सुलभ व सुरळीत करण्याच्या उद्देशाने ही योजना लागू करण्यात आली होती. डिसेंबर २०१४ मध्ये भारतात येणाऱ्या पर्यटकांची संख्या गेल्या वर्षीच्या तुलनेत ४२१.६ टक्क्यांहून अधिक राहिली. डिसेंबर २०१३ मध्ये एकूण २,७०० व्हिसा आॅन अरायव्हल जारी करण्यात आले होते. दुसरीकडे गेल्या डिसेंबरमध्ये ही संख्या १४,००० हून अधिक राहिली. ईटीए तथा फॉरेनर्स रजिस्ट्रेशन अँड ट्रेकिंग याअंतर्गत संभाव्य पर्यटकाला आपल्या घरातूनच भारतीय व्हिसा प्राप्तीसाठी अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध झाली आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)
नवीन व्हिसा योजनेमुळे पर्यटकांत ४२१% वाढ
By admin | Published: February 19, 2015 1:45 AM