खासगी क्षेत्रातील विमान कंपनी अकासा एअरने 43 वैमानिकांविरोधात थेट न्यायालयात धाव घेतली आहे. कारण, या वैमानिकांनी कुठल्याही प्रकारचा नोटीस पीरियड पूर्ण न करता नोकरी सोडली आहे. माध्यमांतील वृत्तांनुसार, आकासा एअरने मुंबई उच्च न्यायालयात एक याचिका दाखल करत, संबंधित वैमानिकांना त्यांच्या करारानुसार आवश्यक नोटीस पीरियड पूर्ण होईपर्यंत कोणत्याही नव्या कंपनीत अथवा संस्थेत सामील होण्यापासून रोखण्यात यावे, अशी मागणी केली आहे. आकासा एअरच्या वैमानिकांच्या नोटीसचा कालावधी 6 महिन्यांचा आहे
यासंदर्भात माहिती देताना अकासा एअरचे प्रवक्ते म्हणाले, हे केवळ बे कायदेशीरच नाही, तर अनैतिक आणि स्वार्थीपणाचे कृत्य आहे. यामुळे ऑगस्ट महिन्यातील विमानसेवा विस्कळीत झाल्या आणि अनेक उड्डाणे शेवटच्या क्षणी रद्दही करावी लागली. यामुळे अनेक प्रवाशांना नाहक त्रास सोसावा लागला.
महत्वाचे म्हणजे, भारतीय विमान वाहतूक क्षेत्रातील अकासा एअर ही एक नवी कंपनी आहे. या एअरलाइनची देशांतर्गत बाजारातील हिस्सेदारी जुलै महिन्यात 5.2 टक्क्यांनी घसरून ऑगस्टमध्ये 4.2 टक्क्यांवर आली आहे. संबंधिक वैमानिकांमुळे ही घसरण झाल्याचे मानले जात आहे.