Join us

कारखाना बंद पडल्यास कामगारांना ४५ दिवसांचा पगार

By admin | Published: July 08, 2015 11:24 PM

कामगार कायद्यातील सुधारणांद्वारे सामाजिक सुरक्षा वाढविण्यावर भर दिला जाणार असल्याचे केंद्रीय श्रममंत्री बंडारू दत्तात्रेय यांनी बुधवारी एका मुलाखतीत स्पष्ट केले

हैदराबाद : कामगार कायद्यातील सुधारणांद्वारे सामाजिक सुरक्षा वाढविण्यावर भर दिला जाणार असल्याचे केंद्रीय श्रममंत्री बंडारू दत्तात्रेय यांनी बुधवारी एका मुलाखतीत स्पष्ट केले. बंद पडलेल्या कारखान्यांमधील कामगारांना दिली जाणारी नुकसानभरपाई आता तिप्पट केली जाईल. आधी फक्त १५ दिवसांचा पगार दिला जायचा यापुढे तो ४५ दिवसांचा राहील, असे ते म्हणाले.कारखाना बंद पडल्यास तो वाचविला जाऊ शकणार नाही; मात्र कामगारांना ४५ दिवसांचे वेतन दिले जावे. तशी परिस्थिती उद्भवल्यास कामगारांचे हित जोपासले जाईल. सध्या एक महिन्याची नोटीस देऊन कारखाना बंद किंवा कर्मचारी कपात केली जाते. यापुढे तीन महिन्यांची मुदत द्यावी लागेल. कपात केलेल्या कर्मचाऱ्यांना सध्या सेवेनुसार वर्षामागे १५ दिवसांचा पगार दिला जातो. तो तिप्पट करताना ४५ दिवसांचा राहील. कामगार कायद्यातील सुधारणा कामगारांच्या हिताच्या असून व्यवसायाला प्रोत्साहन देणाऱ्या आहेत.कामगार कायद्यातील सुधारणा कंपन्यांना कामगार कपात अधिक सुलभ करणाऱ्या आहेत काय? यावर ते म्हणाले की, एखादा कारखाना बंद पडला तरी कामगारांना अधिक लाभ मिळावा हा त्यामागचा उद्देश आहे. रोजगार निर्मिती, गुंतवणूक वाढविण्यावर भर दिला जाणार असून मेक इन इंडिया, स्कील इंडिया यासारखे कार्यक्रम यशस्वी करायचे आहेत. (वृत्तसंस्था)