Join us

४,७४० कोटी चलनातून गायब - RBI

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 01, 2018 4:55 AM

चलनातून ४,७४० कोटी रुपयांची रोख अचानक कमी झाली आहे.

मुंबई : चलनातून ४,७४० कोटी रुपयांची रोख अचानक कमी झाली आहे. रिझर्व्ह बँकेने दिलेल्या माहितीनुसार १८ ते २५ मेदरम्यान चलनातील रोख त्याआधीच्या आठवड्यापेक्षा कमी झाली आहे.रिझर्व्ह बँकेकडून मागील चार वर्षात सरासरी ४१ टक्के अधिक रोख बाजारात आणली गेली आहे. केवळ नोटाबंदी काळात रोखीत घटझाली होती. पण त्यानंतरच्या दीड वर्षात १२२ टक्के अधिक रोख बाजारात आणली गेली.चालू आर्थिक वर्षात १ एप्रिल ते १८ मे या कालावधीत एकूण १.०६ लाख रुपयांची रोख रिझर्व्ह बँकेने बाजारात आणली. त्यानुसार १८ मे रोजी संपलेल्या आठवड्यात १९.३५ लाख कोटी रुपये चलनात होते. पण त्यानंतर २५ मे रोजी संपलेल्या आठवड्यात चलनातील रोख १९.३० लाख कोटी रुपयांवर आली आहे. त्यात ४७४० कोटी रुपयांची घट झाली.रोखीचा पुरवठा सातत्याने वाढता असताना अचानक रोख कमी होण्याचे नेमके कारण रिझर्व्ह बँकेने दिलेले नाही. याखेरीज चलनातील रोख कमी झाली तर ती गेली कुठे? याबाबतही बँकेच्या अधिकाऱ्यांनी माहिती देण्यास नकार दिल्याने याविषयी आर्थिक क्षेत्रात संभ्रमाचे वातावरण आहे.ठेवींमध्ये २१,५५० कोटींची घट : रिझर्व्ह बँकेकडून रोखीचा पुरवठा वाढत असतानाच बँकांच्या रिझर्व्ह बँकेतील ठेवीही वाढत होत्या. पण १८ ते २५ मेदरम्यान या ठेवींमध्येही २१,५५० कोटी रुपयांची घट झाली.रिझर्व्ह बँकेची द्वैमासिक पतधोरण आढावा बैठक ४ जूनला सुरू होत आहे. सध्या इंधनदर वाढल्याने महागाईतही वाढ होणार आहे. या वाढत्या महागाईचे प्रतिबिंब बँकेच्या तीन दिवसीय बैठकीत नक्कीच दिसेल. त्यामुळे महागाई कमी करण्यासाठीच बैठकीच्या पार्श्वभूमीवरच चलनातील रोख कमी करण्यात आल्याची शक्यताही वर्तवली जात आहे.