गुजरातमध्ये आयकर विभागाने एका चहा विक्रेत्याला ४९ कोटी रुपयांच्या दंडाची नोटीस पाठवली आहे. चहा विक्रेते खेमराज दवे असं या विक्रेत्याचे नाव आहे. यांच्या खात्यातील ३४ कोटी रुपयांच्या बेकायदेशीर व्यवहाराबाबत आयकर विभागाने ही नोटीस पाठवली आहे. दवे यांचे एका मार्केटमध्ये चहाचे दुकान आहे. त्यांना याआधीही एक, दोन वेळा आयकर विभागाची नोटीस आली होती. पण, ती नोटीस इंग्रेजीमध्ये असल्याने त्यांनी दुर्लेक्ष केले. तिसऱ्यांदा ही नोटीस आल्यानंतर त्यांनी ती नोटीस वकीलांना दाखवली. यानंतर सर्व प्रकरण उघडकीस आले.
चहा विक्रेते खेमराज दवे यांनी ही नोटीस वकील जोशी यांना दाखवली. जोशी म्हणाले की, ही नोटीस २०१४-१५ आणि २०१५-१६ या आर्थिक वर्षांमध्ये बेकायदेशीर व्यवहारांबद्दल त्यांच्यावर लावण्यात आलेल्या कर दंडाबाबत आहे. मात्र, त्यांच्या खात्यात असा कोणताही व्यवहार झाला नसल्याने त्यांनी एका आयकर अधिकाऱ्याची भेट घेऊन संपूर्ण माहिती सांगितली. यानंतर आयकर अधिकाऱ्यांनी त्यांना सांगितले की, त्यांच्या नावावर कोणीतरी खाते उघडून त्या खात्याचा वापर केला आहे.
यानंतर चहा विक्रेते दवे यांच्या संपूर्ण प्रकरण लक्षात आले. ते ज्या दोन भावांना जवळपास १० वर्षांपासून चहा देत होते. त्यांनीच त्यांच्या कागदपत्रांचा गैरवापर करून फसवणूक केली. त्यानंतर त्यांनी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला.
दाखल केलेल्या एफआयआरनुसार, बनासकांठा येथील कांकरेज येथील रहिवासी खेमराज दवे २०१४ पासून पाटण कमोडिटी मार्केटमध्ये चहाचे दुकान चालवत आहेत. तेव्हापासून त्यांच्या दुकानातून मेहसाणा येथील रहिवासी अल्पेश पटेल आणि विपुल पटेल यांच्या कार्यालयात चहा पाठवत होते.
२०१४ मध्ये दवे यांनी अल्पेशला त्यांचे पॅनकार्ड त्यांच्या बँक खात्याशी लिंक करण्यासाठी मदत मागितली होती आणि त्याला त्यांचे आधार कार्ड, पॅन कार्ड आणि आठ फोटो दिले होते. यानंतर अल्पेश दवे यांच्या चहाच्या दुकानात गेला आणि अनेक कागदपत्रांवर स्वाक्षरी करून घेतली आणि नंतर आयकर विभागाच्या नियमांचा हवाला देत फोटोसह दवे यांचे आधार कार्ड परत केले.
पोलिसांनी या प्रकरणी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दोन्ही भावांची चौकशी करण्यात आली आहे, मात्र अद्याप त्यांना अटक करण्यात आलेली नाही.