लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : देशात ५जी मोबाईल सेवेला सुरूवात झाल्यानंतर स्मार्टफाेन उत्पादन क्षेत्राबाबत सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. मोबाईल फोन उत्पादक कंपन्यांना देशात ४जी स्मार्टफोनचे उत्पादन बंद करण्याचे निर्देश दिले केंद्र सरकारने आहेत. यापुढे कंपन्या १० हजार रुपयांपेक्षा अधिक किमतीचे ४जी स्मार्टफाेन बनविणार नाहीत. त्याऐवजी ५जी नेटवर्कसक्षम असलेले फोन बनवतील. त्यामुळे ३जी पाठोपाठ ४जी युगाचाही लवकरच अस्त होताना दिसणार आहे.
दूरसंचार विभाग आणि इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने टेलिकॉम कंपन्या आणि स्मार्टफोन उत्पादक यांच्यासोबत नुकतीच एक महत्त्वाची बैठक घेतली. पुढील ३ महिन्यांत ५जी सेवेकडे स्थलांतरित होण्याचे निर्देश कंपन्यांना या बैठकीत देण्यात आले.
- प्राप्त माहितीनुसार, ही बैठक एक तासापेक्षा अधिक काळ चालली. या बैठकीला ॲपल, सॅमसंग आणि अन्य बड्या कंपन्यांचे अधिकारी तसेच दूरसंचार कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
- ५जी नेटवर्क सुलभतेने उपलब्ध व्हावे यासाठी अपग्रेडेशन सुरू असल्याचे दूरसंचार कंपन्यांनी यावेळी सांगितले.
या शहरात सुरू झाली ५जी इंटरनेट सेवा
- भारती एयरटेल आणि रिलायन्स जिओ या कंपन्यांनी १ ऑक्टोबरपासून काही मोजक्या शहरांत ५जी सेवा सुरू
केली आहेत.
- या शहरांत दिल्ली, मुंबई, कोलकाता, बंगळुरु, हैदराबाद, सिलिगुड़ी, नागपूर आणि वाराणसी यांचा समावेश आहे.
- ज्या शहरांत ५जी सेवा सुरू झाली तेथील वापरकर्त्यांनी काही सेकंदात डाटा संपल्याची तक्रार केली आहे. ५ जी इंटरनेटची स्पीड ५०० ते ६०० एमबीपीएसपर्यंत असल्याचे चाचणीत आढळून आले आहे.
- जिओ आपल्या वापरकर्त्यांना अमर्याद ५जी इंटरनेट देत आहे. एअरटेल मात्र जुन्याच प्लॅनमध्ये ५जी सेवा देत आहे.
- वास्तविक अजून दोन्ही कंपन्यांनी ५जी प्लॅन घोषित केलेले नाहीत. ॲपल इंडियाने अद्याप ५जी चाचणी सुरू केलेली नाही.
देशात १० कोटी लोकांकडे ५जी फोन
- भारतात सध्या ७५ कोटी मोबाईल फोन वापरकर्ते आहेत. त्यापैकी १० कोटी वापरकर्ते ५ जी स्मार्टफोन वापरतात.
- ३५ कोटी वापरकर्ते मात्र आजही ३ जी आणि ४ जी स्मार्टफोन वापरतात.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"