नवी दिल्ली : चलनात असलेल्या ५, १० आणि १०० रुपयांच्या जुन्या क्रमांकाच्या नोटा मागे घेण्यात येणार असल्याच्या बातम्यांचे रिझर्व्ह बँकेने सोमवारी अधिकृतरीत्या खंडन केले आहे. या बातम्याच चुकीच्या आहेत, असे रिझर्व्ह बँकेने म्हटले आहे. रिझर्व्ह बँकेने एक अधिकृत ट्विट जारी करून ही माहिती दिली.
५, १० आणि १०० रुपयांच्या जुन्या नोटा चलनातून काढून घेतल्या जाणार आहेत, अशा बातम्या काही दिवसांपासून अचानक चर्चेत आल्या आहेत. येत्या मार्चनंतर या नोटा अवैध ठरतील, असे या बातम्यांत म्हटले आहे. या नोटांबद्दल संशय निर्माण झाल्यामुळे सामान्य नागरिक या नोटा स्वीकारेनासे झाले आहेत. या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँकेने एक ट्विट करून खुलासा केला आहे. रिझर्व्ह बँकेने म्हटले की, ५, १०आणि १०० रुपयांच्या नोटा चलनातून काढून घेण्यात येणार असल्याचे वृत्त चुकीचे आहे. या नोटा चलनातून काढून घेण्याची कोणतीही योजना नाही.
नव्या, जुन्या नोटा कायम राहणार चलनातरिझर्व्ह बँकेने २०१८ मध्ये १०, ५० आणि २०० रुपयांच्या नव्या नोटा जारी केल्या होत्या. त्याआधी २०१६ मध्ये मोदी सरकारने १,००० आणि ५०० रुपयांच्या नोटांवर बंदी घातली होती. या संपूर्ण काळात ५, १० आणि १०० रुपयांच्या नोटा चलनात कायम होत्या. २०१९ मध्ये रिझर्व्ह बँकेने १०० रुपयांच्या नव्या डिझाइनच्या नोटा चलनात आणल्या होत्या. नव्या आणि जुन्या अशा दोन्हीही नोटा कायम राहतील, असे रिझर्व्ह बँकेकडून सांगण्यात आले.