लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : कोविड-१९ आणि काळी बुरशी (ब्लॅक फंगस) या साथरोगांच्या औषधांवरील वस्तू व सेवा करात (जीएसटी) कपात करण्याचा निर्णय शनिवारी जीएसटी परिषदेत घेण्यात आला. मेडिकल ऑक्सिजन आणि ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर्स यांसह इतर वैद्यकीय उपकरणांवरील करातही कपात करण्यात आली असून, कोविड-१९ लसीवरील करात कपात करण्याची मागणी मात्र फेटाळण्यात आली आहे. यामुळे कोरोनावरील उपचार खर्चात आणखी घट होऊन सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या परिषदेच्या ४४ व्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. एकूण १८ औषधे व उपकरणांवरील करांत कपात करण्यात आली आहे. कोविड लसीवरील ५ टक्के जीएसटी मात्र कायम राहणार आहे. लस उत्पादकांना इनपुट टॅक्स क्रेडिटची सुविधा मिळणार आहे. मेघालयाचे उपमुख्यमंत्री कोनार्ड संगमा यांच्या नेतृत्वाखालील मंत्री समूहाने केलेल्या शिफारशींनुसार कर कपातीचा निर्णय घेण्यात आला आहे. ३० सप्टेंबर २०२१ पर्यंत कपातीची सवलत सुरू राहील. जीएसटी परिषदेने मंत्री समूहाच्या बहुतांश शिफारशी स्वीकारल्या आहेत. महसूल सचिव तरुण बजाज सांगितले की, याची अधिसूचना उद्या वा परवा जारी केली जाईल.
लसीवरील ५ टक्के जीएसटीचा बोजा सामान्य माणसावर पडणार नाही. कारण ७५ टक्के लसी सरकारच खरेदी करीत आहे. तसेच सरकारी रुग्णालयांत नागरिकांना मोफत लस उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.
- निर्मला सीतारामन,
केंद्रीय अर्थमंत्री
खासगी रुग्णालयांकडून १७ टक्के लसींचा वापर
नवी दिल्ली : केंद्र सरकारकडून देशातील खासगी रुग्णालयांना मे महिन्यात मिळालेल्या कोरोना लसींपैकी फक्त १७ टक्के लसींचा वापर झाला आहे. या रुग्णालयांत कोरोना लसींच्या असलेल्या किंमती खिशाला परवडत नसल्याने तिथे मोठ्या संख्येने लोक गेले नसावेत अशी शक्यता वर्तविली जात आहे.
अशी झाली जीएसटी दरात कपात
औषधे / उपरकरणे आधीचा दर सुधारित
टोसीलायझुमॅब, ॲम्फोटेरीसीन-बी ५ टक्के ० टक्के
रेमडेसिविर, हेपारिन १२ टक्के ५
ॲम्ब्युलन्स २८ टक्के १२ टक्के
मेडिकल ऑक्सिजन, ऑक्सिजन
कॉन्सन्ट्रेटर्स व्हेन्टिलेटर्स, बीपॅप यंत्रे
व हायफ्लो नेसल कॅन्युला उपकरणे १२ टक्के ५ टक्के
कोविड टेस्टिंग किट, पल्स ऑक्सिमीटर १२ टक्के ५ टक्के
हँडसॅनिटायझर्स, तापमापक,
स्मशानभूमींतील गॅस/विद्युत दाहिन्या १८ टक्के ५ टक्के