Full Service Airlines : जगभरात वेगाने विस्तारणारा विमान वाहतूक उद्योग भारतात मात्र डबघाईला आल्याचे चित्र आहे. गेल्या १७ वर्षातील एक एक करुन कंपन्या बंद किंवा विकल्या जात आहेत. यात आज आणखी एका विमान कंपनीचा समावेश होणार आहे. विस्तारा सोमवारी एअर इंडिया समूहात सामील होणार आहे. या विलयानंतर वेगाने वाढणाऱ्या भारतीय विमान वाहतूक क्षेत्रातील पूर्ण-सेवा विमान कंपन्यांची (एफएससी) संख्या ५ वरून केवळ एक राहणार आहे. फुल-सर्व्हिस एअरलाइन्स (full service airlines), ज्यांना लीगेसी एअरलाइन्स म्हणूनही ओळखले जाते. यामत प्रवाशांना विमानातील जेवण, स्नॅक्स, शीतपेये, उशा, ब्लँकेट आणि उड्डाणादरम्यान मनोरंजन इत्यादी विविध सेवा पुरवल्या जातात.
याशिवाय लॉयल्टी प्रोग्राम, एअरपोर्ट लाउंज ऍक्सेस, कनेक्टिंग फ्लाइट्स आणि मल्टी क्लास सेवा यांचा समावेश आहे. पूर्ण सेवा एअरलाइन्स सामान्यत: हब-अँड-स्पोक मॉडेलवर चालतात, ज्यामध्ये देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय डेस्टीनेशन कव्हर करणारे विस्तृत मार्ग नेटवर्क असते.
एअर इंडियामध्ये २५.१ टक्के हिस्सा असेलविस्ताराचे विलीनीकरण अनेक अर्थांनी वेगळं ठरत आहे. परकीय थेट गुंतवणुकीच्या (FDI) निकषांच्या उदारीकरणानंतर तयार झालेल्या परदेशी विमान कंपनीच्या संयुक्त मालकीची दुसरी भारतीय विमान कंपनी सपुष्टात येणार आहे. विस्तारामध्ये ४९ टक्के भागीदारी असलेल्या सिंगापूर एअरलाइन्सकडे विलीनीकरणानंतर एअर इंडियामध्ये २५.१ टक्के हिस्सा असेल. २०१२ मध्ये तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखालील यूपीए सरकारने परदेशी विमान कंपन्यांना देशांतर्गत विमान कंपनीत ४९ टक्के भागभांडवल खरेदी करण्याची परवानगी दिली होती. यानंतर, गल्फ रिजन एअरलाइन एतिहादने आता बंद पडलेल्या जेट एअरवेजमध्ये २४ टक्के हिस्सेदारी घेतली होती. तर दुसरीकडे AirAsia India आणि Vistara यांचा जन्म झाला होता.
किंगफिशर आणि एअर सहाराही गायबविस्तारा ही गेल्या १० वर्षात ऑपरेशन्स सुरू करणारी एकमेव पूर्ण सेवा वाहक आहे. २००७ मध्ये एअर इंडियामध्ये पूर्ण सेवा वाहक (FSC) इंडियन एअरलाइन्सचे विलीनीकरण झाल्यानंतर भारतात किमान पाच FSC लाँच करण्यात आल्या होत्या. मात्र, कालांतराने किंगफिशर आणि एअर सहारा गायब झाले. किंगफिशर २०१२ मध्ये बंद झाली, तर एअर सहारा जेट एअरवेजने विकत घेतली. त्याचे नाव बदलून जेटलाइट ठेवण्यात आले आणि २०१९ मध्ये जेट एअरवेजमध्ये विलीन करण्यात आले.
स्पर्धेत टिकाव लागला नाहीलक्झरी सुविधा आणि सेवांसाठी प्रसिद्ध असलेल्या जेट एअरवेजला २०१६ पासून स्पाइसजेट आणि इंडिगो सारख्या कमी किमतीच्या उड्डाणे चालवणाऱ्या एअरलाइन्सकडून तगड्या स्पर्धेला तोंड द्यावे लागले. शेवटी २०१७ मध्ये, कंपनी मार्केट शेअरच्या बाबतीत दुसऱ्या क्रमांकावर आली आणि इंडिगोने पहिले स्थान पटकावले. इथून जेट एअरवेजचा तोटा वाढू लागला, कारण किफायतशीर उड्डाणांसमोर या कंपनीला तोटा होत राहिला. इतर अनेक कंपन्यांसोबतही असाच प्रकार घडला.