Join us  

५-जी फोनच्या विक्रीत अमेरिकेला टाकले मागे; ६ महिन्यांत भारतात जगातील १३ टक्के फोनची विक्री

By ऑनलाइन लोकमत | Published: September 11, 2024 6:15 AM

जागतिक पातळीवर ५जी स्मार्टफोनची विक्री २० टक्के वाढली आहे. यात सर्वाधिक २५ टक्के वाटा ॲपलचा आहे.

नवी दिल्ली - या वर्षाच्या पहिल्या सहामाहीत देशात होणाऱ्या ५जी स्मार्टफोनच्या विक्रीने पहिल्यांदाच अमेरिकेलाही मागे टाकले आहे. काउंटरपॉइंट रिसर्चच्या ताज्या अहवालानुसार फोनच्या जगातील एकूण विक्रीत भारताचा वाटा १३ टक्के इतका आहे. भारताने १० टक्के वाटा असलेल्या अमेरिकेला मागे टाकले आहे. चीन ३२ टक्के वाट्यासह पहिल्या स्थानी आहे. 

२०२३-२४ या आर्थिक वर्षात ॲपलने जागतिक स्तरावर विकले जाणारे १४ टक्के आयफोन भारतात असेंबल केले होते. इलेक्ट्रॉनिक्सच्या निर्यातीत भारत चौथ्या स्थानी असून मोबाइल निर्यातीत देशाची कामगिरी सातत्याने वेगाने सुधारत आहे. अमेरिकेला होणारी स्मार्टफोनची निर्यात २०२३-२४ मध्ये ५.७ अब्ज डॉलर्सपेक्षा अधिक झाली आहे. 

खप वेगाने का वाढतोय? 

गेल्या काही वर्षांमध्ये भारतातील इंटरनेट कनेक्टिव्हिटी मोठ्या प्रमाणात  वाढल्याने ५-जी सेवा सर्वदूर पोहोचली आहे. त्यामुळे प्रत्येकाला जवळ ५-जी स्मार्टफोन हवा असे वाटू लागले आहे. सॅमसंग, विवो, शाओमीसारख्या मानांकित कंपन्यांनी परवडणाऱ्या किमतीतील ५-जी फोनची अनेक मॉडेल्स बाजारात उतरवली आहेत. 

कोणते स्मार्टफोन लोकप्रिय? 

जागतिक पातळीवर ५जी स्मार्टफोनची विक्री २० टक्के वाढली आहे. यात सर्वाधिक २५ टक्के वाटा ॲपलचा आहे. आयफोन-१४ आणि आयफोन-१५ या सिरीजना मोठी मागणी आहे. २१ टक्के इतक्या वाट्यासह सॅमसंग ही कंपनी दुसऱ्या स्थानी आहे, तर शाओमी तिसऱ्या स्थानी आहे. लॅटिन अमेरिका, भारत, मध्य पूर्व आणि आफ्रिकेत जोरदार विक्रीचे प्रदर्शन केल्याने मोटोरोलाने सर्वांत वेगाने वाढणाऱ्या १० ब्राँडमध्ये स्थान पटकावले आहे.

टॅग्स :मोबाइल