Join us

1 जानेवारीपासून नियमांमध्ये होणार 5 मोठे बदल; माहिती करून घ्या, अन्यथा...

By ऑनलाइन लोकमत | Published: December 28, 2019 2:47 PM

आजच लक्ष न दिल्यास येणारे वर्ष मनस्तापाचे ठरण्याची शक्यता आहे. 

सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि नववर्षाच्या स्वागतासाठी साऱ्यांची लगबग सुरू झाली आहे. अनेकजण सुट्ट्या घेऊन गोवा, हिलस्टेशनला फिरायला निघाले आहेत. मात्र, त्याआधी काही नियम बदलणार आहेत. याकडे आजच लक्ष न दिल्यास येणारे वर्ष मनस्तापाचे ठरण्याची शक्यता आहे. 

केंद्र सरकारने आधार कार्डाशी पॅन का़र्डाचा नंबर जोडण्याची मुदत गेल्या २ वर्षांपासून वांरवार वाढविली आहे. तरीही बऱ्याचजणांनी पॅन-आधार लिंक करण्याकडे काणाडोळा केला आहे. याचा मोठा फटका बसू शकतो. केंद्र सरकारने आता कोणतीही मुदतवाढ न देण्याचा निर्णय घेतला आहे. ही मुदत 31 डिसेंबर ही अखेरची देण्यात आलेली आहे. अन्यथा पॅन कार्ड रद्द केले जाणार आहे. 

2018-19 या आर्थिक वर्षात उशिराने आयकर भरायचा असल्यास 1 मार्च 2020 पर्यंत विना विलंब शुल्क भरता येणार आहे, पण 31 डिसेंबरपर्यंत भरल्यास लेट फी भरावी लागणार आहे. या काळात 5 हजारांचा दंड आहे. 1 जानेवारीपासून पुढील आर्थिक वर्षासाठी हा दंड 10 हजार करण्यात आला आहे. तर ५ लाखांहून कमी उत्पन्न असल्यास 1 हजार रुपये दंड आकारला जाणार आहे. 

स्टेट बँकेचे मॅग्नेटिक स्ट्रीप असलेले एटीएम कार्ड बदलण्याची शेवटची मुदत 31 डिसेंबरपर्यंतच आहे. 1 जानेवारीपासून या कार्डद्वारे पैसे काढता येणार नाहीत. एसबीआयने नवीन कार्ड घेण्याचे आवाहन केले आहे. 

केंद्र सरकारच्या सबका विश्वास योजनेची मुदत 31 डिसेंबरला संपणार आहे. सेवा कर आणि उत्पादन शुल्काशी संबंधीत जुन्या प्रलंबित प्रकरणांच्या निपटाऱ्यासाठी ही योजना सुरू करण्यात आली होती. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी ही घोषणा केली होती. 

येत्या वर्षापासून एनईएफटीवर बँका कोणतेही शुल्क आकारणार नाहीत. याआधी 24 तास एनईएफटी करण्याची सुविधा देण्यात आली होती. रिझर्व्ह बँकेने हा निर्णय घेतला होता. डिजिटल पेमेंटला चालना मिळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला होता. एचडीएफसी बँकेने वर्षभरापूर्वीच अॅपद्वारे एनईएफटी चार्ज रद्द केला होता. 

वस्तू सेवा कराची (जीएसटी) नोंदणी सुलभ व्हावी यासाठी आधार नंबरद्वारे नोंदणी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच नवीन जीएसटी परतावा करण्याची प्रणाली 1 जानेवारीपासून वापरली जाणार आहे. 

टॅग्स :जीएसटीपॅन कार्डनववर्षआधार कार्डएसबीआय