Join us

२५ किलोंपेक्षा अधिक पाकिटांना ५% सूट; जीएसटीबाबत कर मंडळाचे स्पष्टीकरण

By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2022 10:02 AM

खाद्य वस्तूंवर लावण्यात आलेल्या ५ टक्के वस्तू व सेवा करातून २५ किलोंपेक्षा जास्त वजनाच्या वस्तूंना वगळले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क 

नवी दिल्ली : सोमवारपासून खाद्य वस्तूंवर लावण्यात आलेल्या ५ टक्के वस्तू व सेवा करातून २५ किलोंपेक्षा जास्त वजनाच्या वस्तूंना वगळले आहे. यात विना ब्रँडवाल्या खाद्य वस्तू तसेच पीठ, डाळ आणि धान्ये यांसारख्या पाकीटबंद खाद्य वस्तू यांचा समावेश आहे. 

केंद्रीय अप्रत्यक्ष कर तथा सीमा शुल्क बोर्डाने (सीबीआयसी) रविवारी रात्री उशिरा प्रश्नोत्तर स्वरूपातील एक दस्तावेज जारी करून नव्या जीएसटीबाबत शंकानिरसन केले आहे. त्यात ही माहिती देण्यात आली आहे. नेहमी विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांवरील (एफएक्यू) एका उत्तरात सीबीआयसीने म्हटले आहे की, ५ टक्के कर त्याच वस्तूंवर लागेल ज्या आधीच पाकीटबंद आहेत, तसेच ज्यांचे वजन २५ किलोपर्यंतच आहे. किरकाेळ व्यापारी जर उत्पादक तथा वितरकाकडून २५ किलोचे पाकीटबंद खाद्य साहित्य घेऊन सुटी विक्री करणार असेल, तर त्यावर जीएसटी लागणार नाही. 

एएमआरजी अँड एसोसिएट्सचे वरिष्ठ भागिदार रजत मोहन यांनी सांगितले की, धान्यासारख्या मूलभूत खाद्य वस्तूंवर कर लावल्यामुळे महागाई आणखी वाढेल.

गेल्या आठवड्यात अधिसूचना जारी

गेल्या आठवड्यात सरकारने जारी केलेल्या अधिसूचनेत १८ जुलैपासून बिना ब्रँडवाल्या, तसेच आधीच पाकीटबंद असलेल्या अथवा लेबल असलेल्या खाद्य पदार्थांवर ५ टक्के जीएसटी लागेल, असे म्हटले होते.  याआधी केवळ ब्रँडेड वस्तूंवरच जीएसटी लागत असे. 

धान्य, डाळींना लागू

सीबीआयसी म्हटले की, धान्य, डाळी, पीठ यांचे २५ किलो अथवा २५ लिटरपेक्षा अधिकची पाकिटे ही आधीच पाकीटबंद अथवा लेबलच्या वस्तूंच्या श्रेणीत येणार नाहीत. त्यामुळे त्यांच्यावर जीएसटी लागणार नाही. उदा. आधीच पाकीटबंद असलेले २५ किलो पीठाच्या पाकिटावर जीएसटी लागेल. मात्र, ३० किलोच्या पाकिटावर लागणार नाही. 

टॅग्स :जीएसटी