Join us

५० टक्के गुलाबी नोटा आल्या परत; १.८० लाख कोटी रुपये बॅंकांमध्ये आले 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 09, 2023 10:29 AM

गव्हर्नर शक्तिकांत दास यांची माहिती

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : चलनात असलेल्या २ हजार रुपयांच्या एकूण नोटांपैकी सुमारे ५० टक्के नोटा बँकेत परत आल्या आहेत. आरबीआयने गेल्या महिन्यात या नोटा परत घेण्याची घोषणा केली होती. ३१ मार्च २०२३ पर्यंत २ हजारच्या एकूण ३.६२ लाख कोटी रुपयांच्या नोटा चलनात होत्या. घोषणेनंतर, आतापर्यंत १.८० लाख कोटींच्या नोटा परत आल्या आहेत. २ हजार रुपयांच्या सुमारे ८५ टक्के नोटा बँकेत जमा होतील, तर इतर नोटा बदलून घेतल्या जात असल्याचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी गुरुवारी सांगितले. 

प्रवास करणाऱ्यांना फायदा

आरबीआयने बँकांना ‘रुपे प्रीपेड फॉरेक्स कार्ड’ जारी करण्याची परवानगी देण्याचा निर्णय घेतला. या निर्णयामुळे परदेशात प्रवास करणाऱ्या भारतीयांसाठी पेमेंट पर्याय वाढतील. हे कार्ड एटीएम, पीओएस मशिन आणि परदेशातील ऑनलाइन व्यापारासाठी वापरता येईल. याशिवाय, बँका परदेशात रुपे डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड आणि प्रीपेड कार्ड जारी करू शकतील, ज्याचा वापर भारतासह आंतरराष्ट्रीय स्तरावर केला जाऊ शकतो.

घरांची विक्री वाढणार?      

व्याजदरात कोणतीही वाढ न केल्यामुळे घरविक्रीला आणखी चालना मिळेल, असा अंदाज बांधकाम क्षेत्राने व्यक्त केला आहे. आरबीआय पुढील बैठकीमध्ये रेपो दरात कपात करेल, असा अंदाज आहे, असे क्रेडाईचे अध्यक्ष बोमन इराणी यांनी म्हटले.

मान्सूनचा फटका? 

महागाई लक्ष्यापेक्षा जास्त राहिली आहे आणि २०२३-२४ च्या उर्वरित महिन्यांतही ती अधिक राहण्याची भीती आहे. विशेषत: मान्सून आणि एल निनोचा प्रभाव अद्याप अनिश्चित असल्याने महागाईवर बारकाईने लक्ष ठेवणे आवश्यक असल्याचे गव्हर्नर म्हणाले.

सहकारी बँकांना करता येणार ‘तडजोड’ 

- सहकारी बँका लवकरच एनपीए राइट ऑफ करू शकतील आणि डिफॉल्टर्ससोबत सेटलमेंट करू शकतील. आरबीआयने दबाव असलेल्या मालमत्तांचे निराकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. 

- संस्था आता एनपीएचे निराकरण करण्यासाठी “तडजोड सेटलमेंट आणि राइट-ऑफ”सारखे निर्णय घेऊ शकतील.

विकासदर किती होईल? 

- आरबीआयने चालू आर्थिक वर्षासाठी जीडीपी वाढीचा अंदाज ६.५ टक्क्यांवर कायम ठेवला आहे. देशांतर्गत मागणीची स्थिती सकारात्मक आहे. ग्रामीण भागातही मागणी वाढली आहे. 

- २०२२-२३ मध्ये चांगले रब्बी पीक उत्पादन, सामान्य पावसाळा आणि सेवांमध्ये सातत्यपूर्ण वाढ यामुळे खासगी विक्रीला चालना मिळाली. यामुळे चालू वर्षात आर्थिक घडामोडींचा वेग वाढेल, असे दास म्हणाले.

महागाई वाढेल का? 

आरबीआय गव्हर्नर म्हणाले की, महागाईबाबत अजूनही चिंता आणि अनिश्चितता आहे. आरबीआयच्या अंदाजानुसार, आर्थिक वर्ष २०२३ - २४ मध्ये महागाई ४% च्या वर राहण्याची शक्यता आहे. आरबीआयने आर्थिक वर्ष २०२४ साठी महागाईचा अंदाज ५.२% वरून ५.१% पर्यंत किरकोळ कमी केला आहे. दास यांनी महागाईवर अर्जुनाप्रमाणे लक्ष ठेवण्याच्या गरजेचा पुनरुच्चार केला. ते म्हणाले की, महागाई अजूनही ४%च्या लक्ष्यापेक्षा जास्त आहे. प्रवासाचा शेवटचा टप्पा नेहमीच सर्वांत कठीण असतो, असेही ते यावेळी म्हणाले.

 

टॅग्स :भारतीय रिझर्व्ह बँक