Join us

धनत्रयोदशीला होणार 50 हजार कोटींचा व्यवसाय; तर चीनला 1 लाख कोटींचा झटका

By ऑनलाइन लोकमत | Published: November 09, 2023 3:05 PM

धनत्रयोदशी आणि दिवाळीसाठी देशभरातील बाजारपेठा सज्ज झाल्या आहेत.

Diwali News: वर्षातील सर्वात मोठा आणि देशभरात साजरा केला जाणारा सण म्हणजे दिवाळी आहे. धनत्रयोदशी आणि दिवाळीसाठी देशभरातील बाजारपेठा सज्ज झाल्या आहेत. विशेष म्हणजे, यंदा बाजारात चिनी ऐवजी मेड इन इंडिया वस्तू मोठ्या प्रमाणात विकल्या जात आहेत. देशभरातील व्यापाऱ्यांनीही या दिवाळीसाठी जोरदार तयारी केली आहे. कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रवीण खंडेलवाल यांनी सांगितले की, आज आणि उद्या धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर देशभरातील किरकोळ व्यापार सुमारे 50 हजार कोटी रुपयांवर जाण्याचा अंदाज आहे.

या दिवाळीत व्होकल फॉर लोकलचा मोठ्या प्रमाणात प्रभाव दिसून येत आहे. बाजारपेठांमध्ये जवळपास सर्व खरेदी भारतीय वस्तूंचीच होतीये. एका अंदाजानुसार, दिवाळीशी संबंधित चिनी वस्तूंची विक्री न झाल्यामुळे चीनचा सुमारे एक लाख कोटी रुपयांचा व्यवसाय तोटा झाला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या 'वोकल फॉर लोकल'च्या आवाहनाला आणि केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी महिलांना खरेदीसाठी केलेल्या आवाहनाला पाठिंबा देत CAT ने देशभरातील व्यावसायिक संस्थांना त्यांच्या भागातील महिलांना दिवाळीशी संबंधित उपक्रमांमध्ये सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित करण्याचे आवाहन केले आहे. 

अखिल भारतीय ज्वेलर्स अँड गोल्डस्मिथ्स फेडरेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष पंकज अरोरा म्हणाले की, उद्या होणाऱ्या धनत्रयोदशीच्या विक्रीबाबत देशभरातील दागिने व्यापाऱ्यांमध्ये मोठा उत्साह असून, दागिन्यांच्या व्यापाऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर तयारी केली आहे. नवीन डिझाईनचे दागिने आणि सोने, चांदी, हिरे आदींसह इतर वस्तूंचा मोठा साठा ठेवण्यात आला आहे. 

टॅग्स :दिवाळी 2023व्यवसायगुंतवणूकभारतचीन