Join us

५० हजार टन कांदा आयात करणार

By admin | Published: September 29, 2014 6:14 AM

राजधानी दिल्लीमध्ये सणासुदीच्या काळात कांद्याची टंचाई निर्माण होऊ नये म्हणून राष्ट्रीय कृषी व पणन महामंडळ अर्थात नाफेड पाकिस्तान व अफगाणिस्तानातून कांद्याची आयात करणार आहे

नवी दिल्ली : राजधानी दिल्लीमध्ये सणासुदीच्या काळात कांद्याची टंचाई निर्माण होऊ नये म्हणून राष्ट्रीय कृषी व पणन महामंडळ अर्थात नाफेड पाकिस्तान व अफगाणिस्तानातून कांद्याची आयात करणार आहे. कांदा उत्पादन होणाऱ्या अधिकतर राज्यांमध्ये यंदा खरीप हंगामात कमी पाऊस झाला. परिणामी कांदा लागवड करण्यास उशीर झाल्याने ही परिस्थिती उद्भवली आहे. शेजारी देशातून सुमारे ५०,००० टन कांदा मागविला जाणार आहे.देशातील प्रमुख कापूस उत्पादक राज्यांमध्ये महाराष्ट्रासह कर्नाटक, गुजरात आणि मध्य प्रदेश यांचा समावेश आहे. दिल्ली सरकारच्या अधिकाऱ्यांच्या मते, कांदा पुरवठ्यातील सातत्य कायम ठेवण्यासाठी व भाववाढ रोखण्यासाठी पाक व अफगाणिस्तानातून आयात केली जाणार आहे. दसरा, दिवाळी, बकरी ईद या सणासुदीच्या काळात कांद्याची मागणी वाढणार असल्याच्या पार्श्वभूमीवर सरकार या उपाययोजना करत आहे. नाफेडच्या व्यवस्थापकीय संचालकांनी दिल्ली सरकारला यासंदर्भात एक पत्र लिहिले आहे. सप्टेंबरमधील मागणी पूर्ण करण्यासाठी नाफेडने चीनकडे कांदा आयात मागणी नोंदविली होती. मात्र, दिल्ली सरकारने यामध्ये रस दाखविला नसल्याने कोणतीही आयात करण्यात आली नाही. प्रमुख कांदा उत्पादक राज्यांत मान्सूनच्या विलंबामुळे यंदा कांदा बाजारात येण्यास एक-दोन महिन्यांचा विलंब होऊ शकतो. दरवर्षी साधारणत: सप्टेंबरच्या दुसऱ्या पंधरवड्यात कांदा बाजारपेठेत दाखल होतो. याबाबत नाफेडने २२ जुलै रोजी सर्व राज्यांना कळविले होते. (लोकमत न्यूज नेटवर्क)