ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 13 - रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (आरबीआय) 500 च्या नव्या नोटा जारी करत असल्याचं जाहीर केलं आहे. नोटाबंदी निर्णय जाहीर केल्यानंतर जारी करण्यात आलेल्या 500 च्या नोटांचा हा पुढील भाग असेल. या नव्या नोटा महात्मा गांधी सीरिजमधील असतील. तसंच या नव्या नोटांच्या इन्सेटमध्ये इंग्लिशचं ए (A) अक्षर लिहिलेलं असेल. नव्या नोटेवर आरबीआयचे गव्हर्नर ऊर्जित पटेल यांची स्वाक्षरी असेल. तसंच यासोबत 2017 वर्षही छापलेलं असेल. आरबीआयने पत्रक जारी करत ही माहिती दिली आहे.
8 नोव्हेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नोटाबंदीचा निर्णय जाहीर केल्यानंतर जारी करण्यात आलेल्या 500 च्या नोटांचं आणि नव्या नोटांचं डिजाईन सारखंच असणार आहे. काळ्या पैशाविरोधात कारवाई करण्यासाठी 500 आणि 1000 च्या नोटा चलनातून बाद करत नव्या नोटा जारी करण्यात आल्या होत्या.
नोटाबंदी निर्णयानंतर जारी करण्यात आलेल्या नोटांच्या इन्सेटमध्ये इंग्लिशचं E (ई) अक्षर लिहिलेलं आहे. या नोटा सध्या बाजारात चलनात आहेत. जुन्या 500 रुपयांच्या नोटाही चलनात असतील असं आरबीआयने स्पष्ट केलं आहे.
गेल्या आठवड्यात आरबीआयने 83 टक्के नोटा बदली करण्यात आल्याचा दावा केला होता. तसंच चलन तुटवडा नसल्याचंही सांगितलं होतं.
रिझर्व्ह बँकेच्या ट्विटर हॅण्डलवरही याबाबतची माहिती देण्यात आली आहे. इन्सेटमध्ये A लिहिलेल्या 500 रुपयांच्या नोटा जारी, असं ट्वीटमध्ये लिहिण्यात आलं आहे.
Issue of ₹ 500 banknotes with inset letter ‘A’https://t.co/z8Pvp2uy79
— ReserveBankOfIndia (@RBI) June 13, 2017