नवी दिल्ली : आधारचे नोंदणी सॉफ्टवेअर फुटल्याचे वृत्त आधार प्राधिकरणाने फेटाळून लावले आहे. सॉफ्टवेअर पूर्णत: सुरक्षित असून ते फुटल्याचे वृत्त निराधार व खोटे आहे, असे प्राधिकरणाने म्हटले आहे. आधार नोंदणी व सुधारणा याविषयीची प्रक्रिया कडक नियमानुसार होते. नियम मोडणाऱ्या ५0 हजार आॅपरेटरांना काळ्या यादीत टाकले आहे, असेही आधार प्राधिकरणाने (यूआयडीएआय) म्हटले आहे.आधार नोंदणी सॉफ्टवेअर काळ्या बाजारात विकले जात असल्याचे वृत्त काही माध्यमांनी दिले आहे. कुठल्याही कागदपत्रांशिवाय तसेच बायोमेट्रिक पडताळणी प्रक्रियेला फाटा देऊन आधार कार्ड दिली जात असल्याचा दावा वृत्तात करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर प्राधिकरणाने हे स्पष्टीकरण केले आहे. प्राधिकरणाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, आधार नोंदणी प्रक्रिया अत्यंत कडक नियमानुसार केली जाते. नियम मोडणाºया आॅपरेटरांना ब्लॉक केले जाते. १ लाखापर्यंतच्या दंडाचीही तरतूद आहे. विहित प्रक्रिया पूर्ण न केल्यास आधार नोंदणीच होत नाही. दहाही बोटांचे ठसे, तसेच दोन्ही डोळ्यांच्या प्रतिमा घेतल्याशिवाय आधार नोंदणी होत नाही.