नवी दिल्ली : नीरव मोदीच्या कंपन्यांनी आयात-निर्यातीशी संबंधित तब्बल ५१५ कोटी रुपयांचे आंतरराष्ट्रीय व्यवहार दडवून ठेवले असल्याची माहिती समोर आली आहे. कर चोरी करून करण्यात आलेले हे व्यवहार आता प्राप्तिकर विभागाकडून तपासले जात आहेत.तत्पूर्वी, शनिवारी प्राप्तिकर विभागाच्या वतीने नीरव मोदीच्या मुंबईतील एका गोडाऊनमधून१५0 मौल्यवान चित्रे जप्त करण्यात आली. राजा रवी वर्मा आणि जतीन दास यांसारख्या अत्यंत मान्यवर चित्रकारांची चित्रे यात आहेत. त्यांची किंमत काढण्याचे काम आता प्राप्तिकर विभाग करीत आहे.नीरव मोदीच्या कंपन्यांनी ज्या कंपन्यांशी व्यवहार केले आहेत, त्यांची एक वर्षनिहाय यादी प्राप्तिकर विभाग करीत आहे. या व्यवहारांची प्रत्यक्ष किंमत काढली जात आहे. या व्यवहारांत चुकीचे मूल्य दर्शवून मनी लाँड्रिंग करण्यात आल्याचा आरोप असून, त्या दिशेने तपास केला जात आहे.एका वरिष्ठ प्राप्तिकर अधिकाºयाने सांगितले की, हे व्यवहार नीरव मोदीच्या कंपन्यांच्या वहीखात्यांत नोंदविलेले आहेत. तथापि, मूल्य निर्धारण समायोजनेसाठी योग्य कर प्राधिकरणाकडे त्यांची नोंद झालेली दिसत नाही. असे सगळे व्यवहार आता शोधले जात आहेत.प्राप्त माहितीनुसार, कंपन्यांचे विदेशी व्यवहार प्राप्तिकर विभागाने प्रमाणित केलेल्या ‘फॉर्म ३ सीईडी’मध्ये जाहीर करायचे असतात. अशा सर्व व्यवहारांतील कंपन्यांची नावे व पत्ते नमूद करणे बंधनकारक आहे. ५ कोटींपेक्षा जास्त रकमेच्या देशांतर्गत व्यवहारांची माहिती देणेही बंधनकारक आहे.शेल कंपन्यांची तपासणी-नीरव मोदी याच्याशी संबंधित अनेक शेल कंपन्यांची तपासणी केली जात आहे. पंजाब नॅशनल बँकेत (पीएनबी) ११,४00 कोटींचा घोटाळा करणाºया नीरव मोदीने हिरे आणि सोन्याच्या दागिन्यांच्या आयात-निर्यातीचा तपशीलही दडविल्याची माहिती आहे.यापूर्वी कर विभागाने नीरव मोदीच्या एसईझेडमधील हिºयाच्या साठ्याचे मूल्यांकन केले होते, तेव्हा किमतीत मोठी तफावत दिसून आली. गेल्या वर्षी त्याच्या ठिकाणांवर तपासणी करण्यात आली होती, तेव्हा त्याने निर्यातीसाठीचे १,२१६ कोटी रुपयांचे हिरे देशात बेकायदेशीररीत्या विकल्याचे समोर आले होते.
नीरव मोदीच्या कंपन्यांनी दडवले ५१५ कोटींचे आंतरराष्ट्रीय व्यवहार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2018 1:11 AM