Join us

कर संकलनात ५४ टक्क्यांची वाढ; डिसेंबरमध्ये आगाऊ करापोटी ४.६० लाख कोटी रुपये जमा

By ऑनलाइन लोकमत | Published: December 20, 2021 10:09 AM

चालू आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीमध्ये जमा करण्यात आलेल्या आगाऊ कराच्या रकमेमध्ये गतवर्षाच्या तुलनेत ५३.५ टक्क्यांची वाढ झाली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क

नवी दिल्ली : कोविडच्या संकटामधून अर्थव्यवस्था सावरून पुन्हा गतिमान होत असल्याचे संकेत मिळू लागले आहेत. चालू आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीमध्ये जमा करण्यात आलेल्या आगाऊ कराच्या रकमेमध्ये गतवर्षाच्या तुलनेत ५३.५ टक्क्यांची वाढ झाली आहे. अद्यापही काही बँकांची आकडेवारी मिळणे बाकी असल्याने या रकमेमध्ये वाढ होण्याची शक्यता अर्थमंत्रालयातर्फे व्यक्त करण्यात आली आहे. 

आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीसाठी आगाऊ कर जमा करण्याची मुदत १५ डिसेंबर असते. या तारखेपर्यंत यंदा ४,५९,९१७.१ कोटी रुपयांची रक्कम जमा झाली आहे. मागील वर्षाच्या याच कालावधीमध्ये जमा करण्यात आलेल्या आगाऊ कराची रक्कम २,९९,६२०.५ कोटी रुपयांचा होता. याचाच अर्थ चालू वर्षामध्ये आगाऊ कराचा भरणा ५३.५ टक्क्यांनी जास्त झाला आहे. यामध्ये ३.४९ लाख कोटी रुपयांचा कंपनी कर तर १.११ लाख कोटी रुपयांचा वैयक्तिक प्राप्तिकर असल्याचेही मंत्रालयाने जाहीर केले आहे.

प्रत्यक्ष कर संकलन ६० टक्के वाढले

अर्थ मंत्रालयाने सन २०२१-२२ साठी प्रत्यक्ष कर संकलनाचे आकडेही जाहीर केली आहे. तिसऱ्या तिमाहीमध्ये १६ डिसेंबरपर्यंत ९.४५ लाख कोटी रुपयांच्या कराचे संकलन झाले आहे. मागील वर्षाच्या याच कालावधीमध्ये ते ५.८८ लाख कारेटी रुपये होते. याचाच अर्थ प्रत्यक्ष कर संकलनामध्ये ६०.८ टक्क्यांनी वाढ झाली आहे. मागील वर्षाच्या ९ महिन्यांमध्ये  ६,७५,४०९.५ कोटी रुपये होते. त्यात यंदा ४० टक्के वाढ झाली आहे. मागील वर्षी कोरोनामुळे काही प्रमाणात निर्बंध असल्यामुळे उद्योग धंद्यांच्या वाढीमध्ये काहीशी घट झाली होती. त्याचा परिणाम कर संकलनावरही झाला होता. 

टॅग्स :कर