डीजीसीएच्या सक्तीने दिलेल्या इशाऱ्यानंतरही एअरलाईन्स कंपन्यांचा निष्काळजीपणा सुरूच असल्याचं दिसून येतं. गो फर्स्ट एअरलाइन्स कंपनीच्या विमानाने ९ जानेवारी रोजी बंगळुरू येथून दिल्ली जात असलेल्या ५५ प्रवाशांना विमानतळावरच सोडून उड्डाण केले होते. त्यानंतर, एअरपोर्टवर राहिलेल्या या प्रवाशांनी तीव्र संताप व्यक्त केला होता. याप्रकरणी डीजीसीएने कंपनीकडे लेखी उत्तर मागितले होते. आता, डीजीसीएने कंपनीला १० लाख रुपयांचा दंड ठोठवला आहे.
गो फर्स्टच्या विमानप्रवासातील प्रवाशांसोबत झालेल्या प्रकारामुळे प्रवाशांनी संताप व्यक्त केला. तसेच, कंपनीच्या गैरप्रकाराबद्दल डीजीसीएकडे तक्रारही दाखल केली होती. विशेष म्हणजे विमानाचे उड्डाण होतेवेळी, ऑन बोर्डसाठी बसमध्येच बसले होते. मात्र, तितक्यात कंपनीने प्रवाशांना बसमध्ये सोडूनच उड्डाण केले. दरम्यान, याप्रकरणी प्रवाशांना तक्रारी दाखल केल्यानंतर डीजीसीएने गंभीर दखल घेत कंपनीला १० लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे.
गो फर्स्टने याप्रकराबद्दल प्रवाशांची माफी मागून ५३ प्रवाशांना दुसऱ्या विमानाने दिल्लीला सोडले होते. तर, २ प्रवाशांनी पैसे परत मागितले होते. एका प्रवाशाने ट्विटरवरुन आपली व्यथा मांडली होती. ९ जानेवारी रोजी ५५ प्रवासी ५.३५ वाजल्यापासून विमानाकडे जाण्यासाठी बसमध्ये बसून होते. मात्र, ६.३० मिनिटांपर्यंत त्यांना बसमध्येच थांबून ठेवण्यात आलं. त्यामुळे, विमानाचे उड्डाण झाले अन् प्रवाशांची फ्लाईट मीस झाली. यापूर्वी जानेवारी महिन्यातच ३० प्रवाशांना सोडून एका कंपनीच्या विमानाने उड्डाण केले होते. अमृतसर ते सिंगापूर प्रवासातील या विमानाचे ५ तास अगोदरच उड्डाण झाले होते.