नवी दिल्ली : भारतातील मोठ्या स्टार्टअप कंपन्यांनी सध्या नोकरभरतीमध्ये नव्या पदवीधरांना प्राधान्य दिले असल्याची माहिती जॉब पोर्टल इंडीड इंडियाने केलेल्या एका अभ्यासातून समोर आली आहे. मोठे भांडवल असलेल्या सर्वोच्च ९ स्टार्टअप कंपन्यांनी निवडलेले ५७ टक्के कर्मचारी नवे पदवीधर आहेत.
इंडीडने ३१ आॅक्टोबर २०१६ आणि ३१ आॅक्टोबर २०१७ या एक वर्षातील आकडेवारीचा अभ्यास करून हा निष्कर्ष काढला आहे. फ्लिपकार्ट, हाइक मेसेंजर, इन-मोबी, एमयू सिग्मा, ओला, पेटीएम, शॉपक्ल्यूज, स्नॅपडील, रेन्यू पॉवर आणि झोमाटो या कंपन्यांचा अभ्यास इंडीडने केला. या कंपन्यांनी १ अब्ज डॉलरपेक्षा जास्त भांडवल पणाला लावले आहे.
या नऊ कंपन्यांनी केलेल्या भरतीपैकी ५३ टक्के भरती एकट्या स्नॅपडीलने केली आहे. तथापि, फ्लिपकार्टसोबतची विलीनीकरण चर्चा फसल्यानंतर कंपनीने मोठ्या प्रमाणात नोकरकपात केली. त्यामुळे कंपनी भरतीच्या बाबतीत प्रथम क्रमांकावर येण्याची शक्यता कमी आहे. मोबाइल वॉलेट कंपनी पेटीएमने २३ टक्के, तर शॉपक्ल्यूजने ११ टक्के भरती केली आहे. फ्लिपकार्ट ४ टक्के भरतीसह चौथ्या स्थानी आहे. झोमाटोची भरतीही ४ टक्केच आहे. स्नॅपडील, पेटीएम, शॉपक्ल्यूज आणि फ्लिपकार्ट यांचा एकूण भरतीतील वाटा ९० टक्के आहे.
इंडीड इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक सतीश कुमार यांनी सांगितले की, नव्या पदवीधरांना आलेली मागणी ही लक्षावधी तरुणांसाठी उत्साहाची बाब आहे. यातील ८३ टक्के भरती दिल्ली-एनसीआरसाठी झाली आहे.
या कंपन्यांनी केलेली भरती ही प्रामुख्याने कस्टमर केअर स्पेशालिस्ट, कॉल सेंटर प्रतिनिधी, वितरण चालक आणि सीनिअर प्रोसेस इंजिनिअर या पदांसाठी आहे. या पदांचे मासिक वेतन १२ हजार ते २० हजार यादरम्यान असते. कंत्राटी भरतीचा कलही पाहायला मिळत आहे. यातील बहुतांश रोजगार हे अर्धवेळ स्वरूपाचे आहेत.
५७ टक्के ‘स्टार्टअप’कडून नव्या पदवीधरांना प्राधान्य, जॉब पोर्टल ‘इंडीड इंडिया’चा अहवाल
भारतातील मोठ्या स्टार्टअप कंपन्यांनी सध्या नोकरभरतीमध्ये नव्या पदवीधरांना प्राधान्य दिले असल्याची माहिती जॉब पोर्टल इंडीड इंडियाने केलेल्या एका अभ्यासातून समोर आली आहे.
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 9, 2017 04:40 AM2017-12-09T04:40:02+5:302017-12-09T04:40:18+5:30