Join us  

नोकियाच्या सहकार्यानं एअरटेल आणि बीएसएनएल आणणार 5जी नेटवर्क

By admin | Published: April 10, 2017 2:18 PM

भारती एअरटेल आणि भारत दूरसंचार निगम लिमिटेड (BSNL) या टेलिकॉम कंपन्या नोकियाच्या सहाय्यानं स्वतःच्या नेटवर्कना 5जी मध्ये परावर्तित करणार आहेत.

ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली , दि. 10 - भारती एअरटेल आणि भारत दूरसंचार निगम लिमिटेड (BSNL) या टेलिकॉम कंपन्या नोकियाच्या सहाय्यानं स्वतःच्या नेटवर्कना 5जी मध्ये परावर्तित करणार आहेत. बीएसएनएल आणि एअरटेल या टेलिकॉम कंपन्यांचा नोकियाशी यासंदर्भात सामंजस्य करार झाला आहे. भारतात 5जी नेटवर्क आणण्याच्या उद्देशानेच हा सामंजस्य करार करण्यात आला आहे. या कामासाठी गरज पडणा-या गोष्टी नक्की करू. 5जी नेटवर्क ग्राहकांसाठी उपलब्ध करून देणं हे आमचं ध्येय आहे, असे नोकियाचे भारतातील मार्केटिंग हेड संजय मलिक म्हणाले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात 2019-2020 दरम्यान व्यावसायिक उद्देशपूर्तीसाठी 5जी नेटवर्क लोकांसाठी सेवेत आणलं जाण्याची शक्यता आहे. त्यासाठीच भारतात फिल्ड-कंटेट आणि अ‍ॅप्लिकेशन या गोष्टींची चाचणी 2018 पासूनच केली जात आहे. विशेष म्हणजे नोकिया आधीपासूनच एअरटेलला 9 सर्कलसाठी 4जी सेवा पुरवते आहे. त्यामध्ये गुजरात, बिहार, उत्तर प्रदेश पूर्व, मुंबई, मध्य प्रदेश, पश्चिम बंगाल, ओडिशा, पंजाब आणि केरळ या राज्यांचा समावेश आहे. एअरटेल पूर्वीपासूनच नोकियासोबत काम करत आहे. मात्र बीएसएनएल नव्यानं 5जी नेटवर्कसाठी नोकिया आणि एअरटेलसोबत काम करणार आहे. 5जी नेटवर्कसाठी काय आवश्यक आहे, त्याचं काम कसं चालेल, कोणत्या गोष्टी कराव्या लागतील, यासाठी नोकिया बंगळुरुमधील रिसर्च आणि डेव्हलपमेंट सेंटरमध्ये एक्स्पीरियन्स सेंटर सुरू करणार आहे. जगात 2जी नेटवर्क विकसित होण्यासाठी जवळपास 10 वर्षांचा कालावधी लागला आहे. त्यानंतर 3जी आणि 4जी नेटवर्क विकसित झालं असून, त्यासाठी फार कमी वेळ लागला. तंत्रज्ञानामध्ये भारत इतर देशांच्या तुलनेत तोडीस तोड आहे. एककीडे नोकियाच्या मदतीने बीएसएनएल आणि भारती एअरटेल 5जी नेटवर्कसाठी तयारी करतोय, तर सॅमसंग आणि रिलायन्स जिओ 5जी नेटवर्कसाठी पार्टनरशिप करणार असल्याचे सूत्रांकडून समजले आहे. त्यामुळे 5जी नेटवर्कसाठी आगामी काळात भारतात मोठी स्पर्धा निर्माण होण्याची शक्यता आहे.