5G Spectrum Auction: देशात 5G स्पेक्ट्रमचे लिलाव नुकतेच पार पाडले. रिलायन्स जिओ, व्होडाफोन आयडिया, एअरटेल, अदानी यांनी या लिलावात मोठ्या प्रमाणात स्पेक्ट्रम खरेदी केला. दरम्यान, या लिलावात अपेक्षेप्रमाणेच रिलायन्स जिओ या कंपनीनं सर्वाधिक म्हणजे 88,078 कोटी रूपयांची बोली लावली. दरम्यान, रिलायन्स जिओ देशात सर्वात स्वस्त 5G सेवा उपलब्ध करून देणार असल्याची माहिती आता समोर आली आहे. खुद्द रिलायन्स जिओ इन्फोकॉमचे अध्यक्ष आकाश अंबानी यांनी दिली. मोठ्या प्रमाणात केलेल्या स्पेक्ट्रम खरेदीनंतर रिलायन्स जिओला 22 सर्कल्समध्ये उत्तम सुविधा पुरवण्यास मदत मिळणार आहे.
रिलायन्स जिओन 22 सर्कल्ससाठी 700 MHz चे स्पेक्ट्रम्स खरेदी केले आहे. याशिवाय स्पेक्ट्रम खरेदीत एअरटेलनंही चांगली बोली लावली आहे. एअरटेल, व्होडाफोन आयडिया आणि अदानी नेटवर्क यांनी मिळून एकून 62,095 कोटी रूपयांचे स्पेक्ट्रम्स खरेदी केली. या स्पेक्ट्रम लिलावातून सरकारला 1,50,173 कोटी रूपयांचा महसूल मिळाला आहे.
“आधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार करून भारत जगातील आर्थिक आघाडीची महाशक्ती बनेल असा आमचा विश्वास आहे. हीच दृष्टी आणि विश्वास रिलायन्स जिओ उदयास आली. आम्ही या 5G च्या युगात देशाचं नेतृत्व करायला सज्ज आहोत,” अशी प्रतिक्रिया आकाश अंबानी यांनी दिली.
भारतीयांनी तयार केलेलं तंत्रज्ञान
जिओ चे 5G सोल्यूशन हे भारतीयांनी तयार केले आहे आणि प्रत्येक भारतीयाच्या गरजेनुसार तयार केले आहे. देशव्यापी फायबरची उपस्थिती, कोणतीही परंपरागत पायाभूत सुविधा नसलेले सर्व-IP नेटवर्क, स्वदेशी 5G स्टॅक आणि तंत्रज्ञान इकोसिस्टममधील मजबूत जागतिक सहभागामुळे जिओ कमीत कमी वेळेत 5G रोलआउटसाठी सज्ज आहे.
आम्ही संपूर्ण भारतातील 5G रोलआउटसह 'आझादी का अमृत महोत्सव' साजरा करू. जिओ जागतिक दर्जाच्या, परवडणाऱ्या 5G आणि 5G-सक्षम सेवा देण्यासाठी वचनबद्ध आहे. आम्ही सेवा, प्लॅटफॉर्म आणि उपाय प्रदान करू जे भारताच्या डिजिटल क्रांतीला गती देतील. विशेषत: शिक्षण, आरोग्यसेवा, कृषी, उत्पादन आणि ई-गव्हर्नन्स यासारख्या गंभीर क्षेत्रांमध्ये आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या डिजिटल इंडिया मिशनमध्ये आणखी एक अभिमानास्पद योगदान देऊ असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.