Join us  

BSNL 5G Service : BSNLच्या 4G सिमवर चालणार 5G; खराब नेटवर्कला करा 'बाय-बाय' सर्वात स्वस्तात डेटा आणि कॉलिंग

By ऑनलाइन लोकमत | Published: August 19, 2024 10:59 AM

BSNL 4G/5G Service : बीएसएनएलनं ४जी आणि ५जी मोबाइल युझर्ससाठी सपोर्ट करणारी ओटीए सेवा सुरू केली आहे. तसंच युसिम लाँच करण्यात आलं आहे, तर चला जाणून घेऊया बीएसएनएलची नवी सेवा काय आहे? तसंच, हे कसं काम करतं? याशिवाय सर्वसामान्य युजर्सवर काय परिणाम होईल? हे पाहू.

बीएसएनएलकडून ४ जी सेवा सुरू करण्याची तयारी पूर्ण करण्यात आली आहे. बीएसएनएलकडून ४जी आणि ५जी युझर्ससाठी एक नवीन सिम लाँच केलं जात आहे, ज्याला यूएसआयएम म्हणून ओळखलं जाईल. प्रश्न असा पडतो की यू-सिम म्हणजे काय आणि त्याचे फायदे काय आहेत? कंपनीला जिओ आणि एअरटेलच्या तुलनेत ४जी आणि ५जीमध्ये मागे राहायचे नाही. यामुळेच कंपनी तंत्रज्ञानाच्या पातळीवर स्वत: मोठी प्रगती करत आहे, त्यासाठी बीएसएनएल ४जी आणि ५जी युझर्ससाठी युसिम कार्ड लाँच करत आहे.

काय आहे USIM?

यूएसआयएमला युनिव्हर्सल सबस्क्रायबर्स आयडेंटिटी मॉड्यूल म्हणतात. या सिमकार्डमध्ये एक छोटी चिप असते, ज्यामुळे ती सामान्य सिमकार्डपेक्षा वेगळी बनते. हे सिमकार्ड युजर्सची माहिती साठवते. तसंच, हे अगदी दुसऱ्या सिमकार्डसारखं दिसतं. परंतु यूसिम कार्ड अधिक सुरक्षित मानलं जाते. या सिमचे ऑथेंटिकेशन आणि व्हॅलिडेशन सोपं आहे. बीएसएनएलकडून हे यू-सिम ४जी आणि ५जी युजर्ससाठी आणलं जात आहे. याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे जर तुम्ही बीएसएनएलचं ४जी सिमकार्ड खरेदी केलं तर तुम्हाला बीएसएनएलच्या ५जी सेवेसाठी नवीन सिमकार्ड घ्यावं लागणार नाही. म्हणजेच हे सिमकार्ड ४जी आणि ५जी या दोन्ही नेटवर्कशी सुसंगत असेल.

BSNL ची नवी सेवा

भारत संचार निगम लिमिटेडनं (बीएसएनएल) देशांतर्गत कंपनी टेलिकॉम डेव्हलपमेंट फर्म पायरो होल्डिंग्सच्या सहकार्यानं हे विकसित केलं आहे. बीएसएनएल ४जी आणि ५जी रेडी ओटीए प्लॅटफॉर्म इंडियाच्या बीएसएनएल युझर्ससाठी हे नवीन फीचर असेल. बीएसएनएलनं नवीन ४जी आणि ५जी-रेडी ओव्हर-द-एअर (OTA) आणि युनिव्हर्सल सिम (USIM) प्लॅटफॉर्म लाँच केले आहेत. सध्या बीएसएनएलनं चंदीगडमध्ये या प्लॅटफॉर्मचं उद्घाटन केलं आणि तामिळनाडूतील तिरुचिरापल्ली येथे इमर्जन्सी रिकव्हरी साईट तयार केली आहे.

केव्हा सुरू होणार 4G सेवा?

रिपोर्टनुसार, मार्च २०२५ पर्यंत ४जी सेवा सुरू केली जाऊ शकते. तसंच येत्या ६ ते ८ महिन्यांत देशभरात ४जी सेवा सुरू होऊ शकते. याचं उद्दिष्ट मार्च २०२५ पर्यंत ठेवण्यात आले आहे. तर बीएसएनएलची ५जी सेवा २०२५ च्या अखेरपर्यंत सुरू केली जाऊ शकते. बीएनएसएलकडून स्वस्त डेटा आणि कॉलिंगच्या मदतीनं ग्रामीण भारतातील डिजिटल दरी भरून काढता येईल, असं मानलं जात आहे. पंतप्रधान मोदींच्या आत्मनिर्भर भारताच्या दिशेनं टाकलेलं हे एक पाऊल असेल.

टॅग्स :बीएसएनएल