नवी दिल्ली- केंद्र सरकारकडून प्रवाशांच्या सुरक्षेसाठी गाड्यांमध्ये ६ एअर बॅग्स लावणे बंधनकारक केले जाणार नाही, असे केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी येथे बुधवारी एका कार्यक्रमात स्पष्ट केले आहे. दिवसेंदिवस अपघातांत होणारी वाढ आणि त्यात प्रवाशांचे होणारे मृत्यू रोखण्यासाठी ऑक्टोबर २०२३ पासून खासगी गाड्यांमध्ये ६ एअर बॅग्स बंधनकारक करण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारने ठेवला होता.
या निर्णयाचे सर्व स्तरांतून स्वागत झाले असले तरी कार उत्पादक कंपन्या मात्र यासाठी तयार नव्हत्या. सुरक्षिततेसाठी ६ बॅगांचा वापर केला तर लहान कारच्या उत्पादनखर्चात मोठी वाढ होऊन त्या आणखी महाग होतील, असे या कंपन्यांचे म्हणणे होते. कंपन्यांची ही भूमिका लक्षात घेऊन नितीन गडकरी यांनी याबाबत सरकारची भूमिका स्पष्ट केली आहे.
पुढच्या सीटसाठी बॅग्स अनिवार्य
प्रवाशांच्या सुरक्षेसाठी सरकारने काही नियमात बदल करण्याचा निर्णय घेतला होता. कंपन्यांनाही कारमध्ये सुरक्षा सुविधा करण्यास सांगितले होते. २०२१ पासून पुढच्या दोन्ही सीटसाठी एअर बॅग बंधनकारक केल्या आहेत.