Join us

भारत-इस्रायलमध्ये 6 लाख कोटींचा व्यवसाय, गौतम अदानींचीही मोठी गुंतवणूक

By ऑनलाइन लोकमत | Published: October 08, 2023 4:41 PM

इस्रायल आणि हमास यांच्यात सुरू झालेल्या युद्धाचा परिणाम व्यापारावरही होऊ शकतो.

Israel-Hamas War:इस्रायल आणि पॅलेस्टिनी दहशतवादी संघटना हमास (Israel-Hamas War) यांच्यात पुन्हा युद्धाला सुरुवात झाली आहे. हमासने इस्रायलच्या अनेक ठिकणांवर बॉम्बहल्ले केल्यानंतर इस्रायली लष्करानेही हमासला प्रत्युत्तर दिले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गाझा आणि दक्षिण इस्रायलमध्ये सुरू असलेल्या लढाईत शेकडो लोक ठार झाले आहेत, तर अनेक इमारती उद्ध्वस्त झाल्या आहेत.

या हल्ल्यानंतर इस्रायलने हमासला किंमत चुकवावी लागेल, असा इशारा दिला आहे. दरम्यान, भारत सरकारनेही इस्रायलमधील आपल्या नागरिकांसाठी एक सूचना जारी केली आहे. एअर इंडियाने इस्रायलला जाणारी आपली सर्व उड्डाणे रद्द केली आहेत. विशेष म्हणजे, भारत-इस्त्रायलदरम्यान मोठा व्यवसाय आहे. दिग्गज उद्योगपती गौतम अदानी, यांनीही इस्रायलमध्ये मोठी गुंतवणूक केली आहे.

भारत-इस्रायलचा 6 लाख कोटी रुपयांचा व्यवसाय

इस्रायलमध्ये मोठ्या संख्येने भारतीय नागरिक राहतात. दोन्ही देशांचा व्यवसायही विस्तारत आहे. भारत आणि इस्रायलमधील व्यापार सातत्याने वाढत असल्याची माहिती इस्रायलच्या राजदूताने या वर्षी फेब्रुवारीमध्ये दिली होती. दोन्ही देशांमधील व्यापार पूर्वी 5 अब्ज डॉलर्सचा होता, जो आता 7.5 अब्ज डॉलर्स म्हणजेच 6 लाख कोटी रुपयांहून अधिकचा झाला आहे. भारत आणि इस्रायलचा व्यवसाय बंदरे आणि शिपिंगसह अनेक क्षेत्रांमध्ये अनेक अर्थाने महत्त्वाचा आहे.

गौतम अदानी यांनी गुंतवणूक केली आहेदिग्गज उद्योगपती गौतम अदानी यांनीही इस्रायलमध्ये गुंतवणूक केली आहे. गेल्या वर्षी अदानी पोर्ट्सने इस्रायलसोबत 1.8 अब्ज डॉलर्सचा करार केला होता. या करारामध्ये अदानी पोर्ट्स आणि इस्रायली कंपनी गॅडोट ग्रुप यांच्यात करार करण्यात आला. या दोन कंपन्यांनी मिळून हैफा बंदराच्या खासगीकरणाची निविदा जिंकली. यामध्ये गौतम अदानी यांच्या कंपनीची हिस्सेदारी सुमारे 70 टक्के असल्याचे सांगितले जाते. हे बंदर इस्रायल शिपिंग कंटेनर्समधील सर्वात मोठे बंदर मानले जाते. 

हिरे व्यवसायावरही परिणामभारत आणि इस्रायलमध्ये बंदरे आणि शिपिंग व्यतिरिक्त हिऱ्यांचाही व्यापार होतो. भारत आणि इस्रायलच्या एकूण व्यवसायात हिऱ्यांच्या व्यवसायाचा मोठा वाटा आहे. बीबीसीच्या रिपोर्टनुसार, 1990 पर्यंत दोन्ही देशांमध्ये दरवर्षी 200 मिलियन डॉलर्सचा व्यापार होत होता. जो आता अब्जावधी डॉलर्सवर पोहोचला आहे. यामध्ये हिऱ्यांच्या द्विपक्षीय व्यापाराचा वाटा जवळपास 50 टक्के आहे.

टॅग्स :इस्रायल - हमास युद्धइस्रायल पॅलेस्टाईन संघर्षव्यवसायभारतइस्रायलगौतम अदानी