लाेकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : गुंतवणूक साधन म्हणून लोक आता बँकांतील ठेवींऐवजी म्युच्युअल फंडांना प्राधान्य देत असून, यंदा ६२ टक्के लोकांनी म्युच्युअल फंडांच्या एसआयपीत गुंतवणूक केली आहे. ‘बँक बाजार’च्या वार्षिक ‘मनीमूड’ अहवालात ही माहिती देण्यात आली आहे.
दीर्घ कालावधीच्या बचतीसाठी लोक आतापर्यंत बँकांतील मुदत ठेवी अथवा आवर्ती ठेवींना प्राधान्य देत होते. हा कल आता बदलला असून, मुदत व आवर्ती ठेवींवर म्युच्युअल फंड एसआयपीने मात केल्याचे दिसून येत आहे. २०२२मध्ये हा आकडा ५७ टक्के होता. मुदत व आवर्ती ठेवींद्वारे उत्पन्न मिळवणाऱ्यांची संख्या ५४ टक्क्यांवरून ५७ टक्के झाली आहे. तरीही त्यांच्या तुलनेत एसआयपीमधील ठेवी ५ टक्के अधिक झाल्या आहेत.