मुंबई : वारंवार कर भरण्याच्या नोटिसा देऊनही किंवा एकूणच सातत्याने कर बुडवेगिरी करणाऱ्या देशातील सुमारे ६२८ बड्या करदात्यांविरोधात प्राप्तिकर खात्याने आता कारवाईचा बडगा उगारला आहे. आता करदाते शोधणे अथवा नोटिसा धाडण्यापेक्षा विभागाने फोकस बदलत थेट कारवाई सुरू केल्याने खळबळ उडाली आहे.
विभागातील उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, कर बुडगेविरी करणाऱ्या सुमारे ५५ लाख लोकांना गेल्या दीड वर्षात विभागाने नोटिसा धाडल्या. यापैकी अनेक प्रकरणांची सखोल चौकशीही सुरू झाली आहे. मात्र, नोटिशीला उत्तर न देणाऱ्या किंवा वारंवार विभागाने समन्स पाठवूनही चौकशीस उपस्थित न राहणाऱ्या बड्या ६२८ करदात्यांविरोधात कारवाई सुरू करण्यात आली आहे.
२०१२ चा अर्थसंकल्प सादर करताना तत्कालीन केंद्रीय वित्तमंत्री पी. चिदंबरम यांनी वित्त विधेयकात सुधारणा करीत सेवा कर विभागाला थेट फौजदारी कारवाईचे अधिकार बहाल केले होते. मात्र, केंद्रीय प्रत्यक्ष मंडळ आणि त्याअंतर्गत येणाऱ्या प्राप्तिकर विभागाला अद्यापही थेट फौजदारी कारवाईचे अधिकार नाहीत. या पार्श्वभूमीवर विभागाने अत्यंत सावधपणे आणि काटेकोर चाचपणी करून ६२८ लोकांवर तपास यंत्रणांमार्फत कारवाई सुरू केली आहे. हा आकडा १४ डिसेंबर २०१४ पर्यंतचा असून त्यानंतरच्या दुसऱ्या टप्प्याची यादी बनिवण्याचे काम सुरू असून लवकरच आणखी किमान ५०० लोकांवर कारवाई होणार असल्याची माहिती आहे.
गेल्यावर्षी प्राप्तिकर विभागाने एकूण ४१४ कंपन्यांवर धाडी घातल्या. यातून ५८२ कोटी रुपयांची बेहिशोबी रक्कम जप्त केली, तर या आणि अन्य वैयक्तिक प्रकरणातील कारवाईतून सुमारे ६,७६९ कोटी रुपयांची अघोषित मालमत्ताही जप्त केली आहे. (प्रतिनिधी)
६२८ करदात्यांना कारवाईचा दणका
वारंवार कर भरण्याच्या नोटिसा देऊनही किंवा एकूणच सातत्याने कर बुडवेगिरी करणाऱ्या देशातील सुमारे ६२८ बड्या करदात्यांविरोधात प्राप्तिकर खात्याने आता कारवाई
By admin | Published: February 14, 2015 12:58 AM2015-02-14T00:58:56+5:302015-02-14T00:58:56+5:30