ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 1 - उत्पन्न प्रकटीकरण योजने अंतर्गत एकूण 64,275 करदात्यांनी 65,250 कोटींच्या काळ्या पैशाची माहिती दिली आहे. केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी पत्रकार परिषदेदरम्यान ही माहिती दिली. हा आकडा अजून वाढू शकतो असंही अरुण जेटली यांनी सांगितलं आहे. अरुण जेटली यांनी आयकर अधिका-यांमुळे ही योजना यशस्वी झाल्याचं सांगत त्यांचे आभार मानले.
आयकर चोरी रोखण्यासाठी सरकारकडून महत्वाची पावलं उचलण्यात आली. 1 जूनला सरकारकडून उत्पन्न प्रकटीकरण योजना सुरु करण्यात आली होती ज्याची मुदत 30 सप्टेंबर 2016 च्या मध्यरात्री संपत होती. ज्या लोकांनी काळ्या पैशाची घोषणा केली आहे त्यांनी आपल्या उत्पन्नाच्या 45 टक्के आयकर भरला आहे. काळ्या पैशांची घोषणा करणा-यांची नावे उघड केली जाणार नाहीत असं आश्वासन सरकारने दिलं होतं. त्या व्यक्तीची ओळख पटेल अशी कोणतीच माहिती समोर आणली जाणार नाही असं अरुण जेटलींनी सांगितलं आहे.
पनामा प्रकरणी 250 लोक तसंच संस्थांची माहिती दुस-या देशांना देण्यात आली असून त्याची चौकशी सुरु आहे. एचएसबीसी आणि परदेशात एकूण 58,378 कोटी काळा पैसा असल्याची माहिती मिळाली आहे. सोबतच 1986 कोटी जप्त करण्यात आले असल्याची माहिती अरुण जेटलींनी दिली आहे.
Under tabulation 64,275 declarants and the amount they have disclosed collectively Rs. 65250 cr : FM Arun Jaitley pic.twitter.com/zyf0F6FXSP— ANI (@ANI_news) October 1, 2016
हैदराबाद पहिल्या, मुंबई दुसऱ्या स्थानी
सर्वाधिक उत्पन्न जाहीर करणारे शहर म्हणून हैदराबाद समोर आले. हैदराबादेतून १३ हजार कोटी रुपयांचे उत्पन्न जाहीर केले गेले. त्याखालोखाल मुंबईत ८,५00 कोटी, दिल्ली ६ हजार कोटी, कोलकातामध्ये ४ हजार कोटी रुपयांचे उत्पन्न जाहीर झाले. मुंबईत एकूण ४ हजार लोकांनी या योजनेचा लाभ घेतला. काळा पैसा बाहेर काढण्यास सरकारने ही योजना जाहीर केली होती. बेनामी उत्पन्नावर ४५ टक्के कर भरून उत्पन्न नियमित करून घेण्याची सोय यात होती.