लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली: २०२३ मध्ये ६,५०० अतिश्रीमंत लोक (हाय नेटवर्थ इंडिव्हिज्युअल्स) भारत सोडून विदेशात स्थायिक होण्यासाठी जाण्याची शक्यता असल्याचे ‘हेनले प्रायव्हेट मायग्रेशन रिपोर्ट-२०२३’ मध्ये म्हटले आहे. देश सोडून जाणाऱ्या श्रीमंतांच्या बाबतीत चीन पहिल्या स्थानी, तर भारत दुसऱ्या स्थानी आहे. भारताच्या बाबतीत ही संख्या गेल्या वर्षापेक्षा कमी आहे.
गेल्या वर्षी ७,५०० अतिश्रीमंत लोक भारत सोडून गेले होते. हा अहवाल देणारी हेनले ही संस्था जगभरातील संपत्ती व स्थलांतर यावर नजर ठेवते. अतिश्रीमंत लोक देश सोडून जाण्याच्या बाबतीत भारत जगात दुसऱ्या स्थानी आहे. २०२३ मध्ये चीनमधून १३,५०० अतिश्रीमंत लोक देश सोडून जातील, असा अंदाज आहे.
या यादीत ब्रिटन तिसऱ्या स्थानावर आहे. ३,२०० अतिश्रीमंत ब्रिटिश नागरिक यंदा देश सोडून जाऊ शकतात. चौथ्या स्थानावरील रशियातून ३,००० अतिश्रीमंत लोक देशाबाहेर पडू शकतात. २०२२ मध्ये ८,५०० अतिश्रीमंतांनी रशिया सोडले.
अतिश्रीमंत म्हणजे काय?
१० लाख डॉलर (सुमारे ८,२१,१९,७०० रुपये) किंवा त्यापेक्षा अधिक संपत्ती असलेल्या व्यक्तींना हाय नेटवर्थ इंडिव्हिज्युअल्स अथवा अतिश्रीमंत लोक म्हटले जाते.
का देश सोडतात लोक?
करविषयक गुंतागुंतीमुळे अतिश्रीमंत लोक देश सोडून जातात. भारतातून या कारणामुळे हजारो लोक दरवर्षी बाहेर पडतात.
अतिश्रीमंतांची पसंती कोणत्या देशास?
जगभरातील अतिश्रीमंत लोक दुबई आणि सिंगापूर यांसारख्या देशांना पसंती देत आहेत. करविषयक नियम लवचिक असलेल्या देशांना श्रीमंत लोक विशेष पसंती देतात.