लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : मागील १२ महिन्यांच्या काळात देशातील ६६ टक्के कंपन्यांनी आपली कामे मार्गी लावण्यासाठी सरकारी कार्यालयांत लाच दिली, अशी माहिती ऑनलाइन प्लॅटफॉर्म ‘लोकलसर्कल्स’ने जारी केलेल्या एका सर्वेक्षण अहवालात देण्यात आली आहे.
देशातील १५९ जिल्ह्यांत हे सर्वेक्षण करण्यात आले. १८ हजार लोकांनी त्यात सहभाग घेतला. ५४ टक्के लोकांनी सांगितले की, त्यांना लाच देण्याची इच्छा नव्हती. तथापि, त्यांना लाच देण्यास बाध्य करण्यात आले. ४६ टक्के लोकांनी काम लवकर व्हावे यासाठी स्वेच्छेने लाच दिली. व्यावसायिकांनी सांगितले की, सरकारी विभागांत परमिट अथवा अनुपालन प्रक्रियेस गती देण्यासाठी लाच द्यावीच लागते. मालमत्तेशी संबंधित कामासाठी लाच घेतली जाणे ही सामान्य बाब आहे.
लाच न देणारेही आहेत!
सर्वेक्षणात सहभागी झालेल्या १६ टक्के व्यावसायिकांनी म्हटले की, कोणत्याही प्रकारची लाच न देता काम करण्यात ते नेहमीच यशस्वी होतात. १९ टक्के लोकांनी सांगितले की, त्यांना असे करण्याची गरज भासली नाही.
सर्वेक्षण काय सांगते?
५४% जणांनी इच्छा
नसतानाही दिली लाच
४६% लोकांनी काम लवकर करण्यासाठी दिले पैसे
१९% जणांना असे करावेसे
वाटले नाही
१६% जणांच्या मते लाच
न देता कामे होतात.