Join us

चालवेन तर हक्काचीच कार! तीन महिन्यांत ६७ टक्के जणांची पहिल्यांदाच खरेदी

By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2024 12:03 PM

महिलाही आघाडीवर

नवी दिल्ली : दिवसेंदिवस भारतातील ऑटोमोबाइल उद्योग उभारी घेत आहेत. बाजाराची व्याप्ती लक्षात घेता जगभरातील कंपन्यांनी भारतावर लक्ष केंद्रित केले आहे. अशात भारतीयांमध्येही स्वत:ची हक्काची कार असावी, ही इच्छा बळावल्याचे दिसत आहे. जून ते ऑगस्टदरम्यानचा कार खरेदीचा ट्रेंड पाहता ६७ टक्के ग्राहकांनी पहिल्यांदाच कार खरेदी केल्याचे दिसत आहे. स्पिनी या प्लॅटफॉर्मच्या वतीने जारी करण्यात आलेल्या आकडेवारीतून हे समोर आले आहे.

देशातील ग्राहकांनी प्रामुख्याने  लाल, पांढऱ्या आणि राखाडी रंगांच्या गाड्यांना सर्वाधिक पसंती दिल्याचे दिसते. बहुसंख्य लोकांनी पूर्ण रक्कम भरून कार घेतली आहे, तर लोन काढून कार खरेदी करणाऱ्यांची संख्याही लक्षणीय आहे, असे या अहवालात म्हटले आहे. नव्या गाड्यांसोबत वापरलेल्या किंवा जुन्या कारची मागणी मागील काही दिवसांत मोठ्या प्रमाणात वाढली आहे. 

मॅन्युअल की ऑटोमॅटिक?

७६ टक्के ग्राहकांनी मॅन्युअल ट्रान्समिशनच्या गाड्या खरेदीवर भर दिला. या गाड्यांच्या किमती ऑटोमॅटिक गाड्यांच्या तुलनेत कमी असतात. इंधनावर तसेच देखभाल दुरुस्तीवर खर्चही तुलनेत कमी होतो. 

ऑटोमॅटिक कार घेणाऱ्यांची संख्या या तीन महिन्यांत वाढून ३० टक्क्यांवर पोहोचली आहे. आधीच्या तीन महिन्यांत हे प्रमाण २४ टक्के इतके होते.

लक्झरी की जुन्या गाड्या? 

देशातील शहरी भागांमध्ये लक्झरी गाड्यांची विक्री वाढली आहे. जुन्या, वापरलेल्या लक्झरी गाड्यांनाही शहरांमध्ये मोठी मागणी आहे.

महागड्या आलिशान गाड्यांचे आकर्षण तरुण पिढीमध्ये अधिक आहे, असे या अहवालात म्हटले आहे. 

जुन्या लक्झरी गाड्यांच्या विक्रीमध्ये राजधानी दिल्ली आघाडीवर आहे. दिल्लीपाठोपाठ बंगळुरू आणि मुंबई या शहरांचा क्रमांक लागतो. 

टॅग्स :कारव्यवसाय