कोल्हापूर : येथील न्यू इंडिया अॅशुरन्स कंपनीच्या शाहूपुरी शाखेत लिपिकाने ६८ लाख ५० हजार रुपयांचा अपहार केल्याचे उघडकीस आले. संशयित किरण रत्नाकर माने (रा. बीएलआयसी कॉलनी, कळंबा रोड) असे त्यांचे नाव आहे. याप्रकरणी शनिवारी (दि. १३) शाखा व्यवस्थापक श्रीकांत दत्तू कोले (वय ५७, रा. पाचगाव, ता. करवीर) यांनी माने याच्या विरोधात शाहूपुरी पोलिसांत फिर्याद दिली.पोलिसांनी सांगितले, किरण माने हा इंडिया अॅशुरन्स कंपनीच्या शाहूपुरी शाखेत चार वर्षांपासून लिपिक म्हणून नोकरी करीत होता. दि. १ एप्रिल २०१८ ते ३१ मार्च २०१९ अखेर विमा कंपनीच्या आर्थिक व्यवहारांची त्यांच्याकडे जबाबदारी होती. शाखेच्या वार्षिक लेखा परीक्षणामध्ये ६८ लाख ५० हजार रुपयांचा अपहार झाल्याचे निदर्शनास आले. संशयित माने हा विमा एजंटांसह ग्राहकांचे धनादेश काढत असे. तो रोज १० खात्यांवर धनादेशाद्वारे पैसे भरत असे. त्याने लक्ष्मीपुरीतील बँक आॅफ महाराष्ट्र शाखेत दोन व्यक्तींच्या नावे बनावट खाती उघडून त्यावर तो विमा कंपनीच्या शाखेतून धनादेशाद्वारे पैसे भरत असे.बँकेतून तो स्वत: पैसे काढून घेत असल्याचे निदर्शनास आले. विमा कंपनीच्या प्रशासनाने त्याला तत्काळ निलंबित करून, यासंबंधी शाहूपुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. माने याने कोणाच्या नावे खाती उघडली आहेत. त्या व्यक्तींचा यामध्ये कसा सहभाग आहे. त्यांना मानेकडून किती पैसे मिळाले, हे पोलीस चौकशीत स्पष्ट होणार आहे. पोलीस निरीक्षक संजय मोरे तपास करीत आहेत.
न्यू इंडिया विमा कंपनीत ६८ लाखांचा अपहार
By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2019 4:19 AM