जळगाव : शुक्रवारी एकाच दिवसात सोन्याच्या भावात एक हजार रुपयांनी वाढ झाली. त्यामुळे सोने ६८ हजार ६०० रुपये प्रति तोळा अशा रेकॉर्डब्रेक दरावर पोहोचले आहे. एक तोळा सोन्यासाठी ३ टक्के जीएसटीसह आता ७०,६५८ रुपये मोजावे लागणार आहे. चांदीच्याही भावात ५०० रुपयांची वाढ होऊन ती ७५,५०० रुपये किलोवर पोहचली.
अमेरिकन बँकांची स्थिती बिकट झाल्याने मार्चच्या सुरुवातीपासूनच सोन्याचे भाव वाढू लागले. गेल्या आठवड्यात २१ मार्च रोजी सोन्याने ६७ हजारांचा पल्ला ओलांडला व ते ६७ हजार ३०० रुपये प्रति तोळ्यावर पोहचले होते.
अमेरिकन बँकांची बिकट झालेली स्थिती सुधारत नसताना त्यांनी व्याजदर आणखी कमी केल्याने विदेशात मोठ्या प्रमाणात सोन्यामध्ये गुंतवणूक वाढत आहे. त्यामुळे भाव झपाट्याने वाढत आहेत. ही वाढ अशीच कायम राहिल्यास दिवाळीपर्यंत सोने ७५ हजार रुपये प्रति तोळ्यापर्यंत जाऊ शकते. - सुशील बाफना, सुवर्ण व्यावसायिक, जळगाव.