Join us

देशात ७ लाख ग्राहक नवीन कारच्या प्रतीक्षेत; सेमीकंडक्टर तुटवड्यामुळे वाहन उत्पादन, पुरवठा घटला

By ऑनलाइन लोकमत | Published: December 22, 2021 10:37 AM

सेमीकंडक्टर चिप तुटवड्यावर नजीकच्या काळात ताेडगा निघण्याची शक्यता कमीच असल्याचे सांगितले जात आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क

नवी दिल्ली : संपूर्ण जगाला गेल्या काही महिन्यांपासून सेमीकंडक्टरचा तुटवडा जाणवत आहे. याचा सर्वांत माेठा परिणाम वाहन विक्रीवर झाला आहे. तुटवड्यामुळे वाहन उत्पादन घटले असून, पुरवठाही कमी झाला आहे. सद्य:स्थितीत देशात सात लाख ग्राहक कार खरेदीच्या वेटिंग लिस्टवर आहेत. अनेक गाड्यांच्या डिलिव्हरीसाठी चार ते सहा महिन्यांचे वेटिंग आहे.

काेराेना काळात लावण्यात आलेल्या निर्बंधांमुळे सार्वजनिक वाहतुकीला मर्यादा हाेत्या. त्यामुळे स्वत:च्या वाहन खरेदीकडे लाेकांचा कल हाेता. अर्थव्यवस्था रुळावर येऊ लागताच कारसाठी मागणी माेठ्या प्रमाणात वाढली. मात्र, जगावर सेमीकंडक्टर चिप तुटवड्याचे एक नवे संकट आले. त्यामुळे कार उत्पादन आणि पुरवठ्यावर परिणाम झाला. सध्या कार खरेदीसाठी खूप माेठी वेटिंग लिस्ट आहे. अनेक कंपन्यांनी गेल्या काही महिन्यामध्ये नवे माॅडेल्स लाँच केले. ते खरेदी करण्यासाठी ग्राहक तयार आहेत. मात्र, त्यांना चार ते सहा महिने वाट पाहावी लागत आहे. काही लाेकप्रिय गाड्यांसाठी तर चक्क वर्षभरापर्यंत वेटिंग आहे.

ग्राहकांना दुहेरी फटका 

कारची डिलिव्हरी हाेण्यास विलंब झाल्याचा ग्राहकांना दुहेरी फटका बसताे. एकतर  गाडी हातात येण्यासाठी बराच काळ वाट पाहावी लागते. या वर्षात सर्वच कार कंपन्यांनी किमतीमध्ये वाढ केली आहे. त्यामुळे डिलिव्हरी घेताना वाढीव किमतीनुसार पैसे द्यावे लागतात. यावर्षी साधारणत: ६ ते ८ टक्के किमती वाढल्या आहेत.

ई-वाहनांवर परिणाम

सध्या इलेक्ट्रिक कारची मागणी वाढत आहे. नव्या तंत्रज्ञानावर आधारित असल्यामुळे या गाड्यांना अनेक चिप्स लागतात. त्यामुळे या श्रेणीतील गाड्यांसाठी माेठा वेटिंग पिरियड आहे.

ताेडगा लवकर नाहीच 

- सेमीकंडक्टर चिप तुटवड्यावर नजीकच्या काळात ताेडगा निघण्याची शक्यता कमीच आहे.

- तज्ज्ञांच्या मते, २०२२ च्या पहिल्या सहामाहीपर्यंत अडचण कायम राहू शकते. 

- सध्या सणासुदीच्या दिवसामुळे मागणी वाढली आहे. 

- जानेवारीनंतर काही प्रमाणात दिलासा मिळू शकेल, असे काहींचे म्हणणे आहे.

काेणत्या कंपनीकडे किती ग्राहक प्रतीक्षेत 

- मारुती - २.५ लाखाहून अधिक- ह्युंदाई - १ लाख - टाटा मोटर्स - १ लाख- महिंद्र आणि महिंद्र - १ लाख- किया माेटर्स : ७५ हजार- एमजी माेटर्स - ४६ हजार- फोक्स वॅगन, टोयोटा, निसान, रेनॉ, स्कोडा इत्यादी - ७५ हजारांहून अधिक 

टॅग्स :वाहनवाहन उद्योग