मुंबई : आलीशान हॉटेल, रिसॉर्टचे प्रलोभन दाखवून सामान्यांचे पैसे लुटणा-या पॅनकार्ड क्लब्सच्या मुसक्या आर्थिक गुन्हे शाखेने (ईओडब्ल्यू) आवळल्या असून, सहा संचालकांवर गुन्हा दाखल केला आहे. यात ५० लाख गुंतवणूकदारांचा पैसा गुंतलेला असून, घोटाळा ७०३५ कोटी रुपयांचा आहे.पॅनकार्ड कल्ब्स लिमिटेड ही मुंबई शेअर बाजारात प्रविष्ट असलेल्या पॅनारॉमिक समुहाची उपकंपनी आहे. कंपनीच्या संचालकांनी देशभरात हॉटेल्स आणि रिसॉर्ट्स असल्याचे भासवून सदस्यांच्या रुपात गुंतवणूकदार तयार केले. त्यांच्याकडून पैसा गोळा केला. त्या बदल्यात हॉटेल्स आणि रिसॉर्टमध्ये मोफत सुट्टी घालविण्याचे तसेच परताव्याचे प्रलोभन देण्यात आले होते. मात्र गुंतवणूकदारांना लाभ मिळाला नाही की परतावा. यामुळेच काहींनी सेबी तर काहींनी रोखे तदर्थ लवादाकडे (सॅट) धाव घेतली होती.सेबीकडून या प्रकरणाची चौकशी सुरू असताना ही कंपनी परवानगी न घेता एकत्रित गुंतवणूक योजना (सीआयएस) राबवित असल्याचे समोर आले. यामुळे त्यांनी गुंतवणूकदारांचे पैसे परत करण्याच्या सुचना कंपनीला दिल्या. मात्र कंपनीने सेबी व पुढे सॅटच्या आदेशांकडेही दूर्लक्ष करीत गुंतवणूकदारांकडून पैसा घेणे सुरूच ठेवले. यामुळे सेबीने कंपनीच्या ३४ प्रॉपर्टी जप्त करीत २५० बँक खाती गोठवून ठेवली आहेत. आता ईओडब्ल्यूनेही कारवाई केली.सूत्रांनुसार, दादर येथील एका गुंतवणूकदाराने तीन दिवसांपूर्वीच पोलीस ठाण्यात येऊन फसवणुकीची तक्रार केली. अशाच काही तक्रारी थेट ईओडब्ल्यूकडेही आल्या होत्या. कंपनीचे प्रभादेवी येथील कार्यालय बंद असून ही फसवणूक मोठी असल्याचे तपासाअंती समोर आले. यामुळे ईओडब्ल्यूने भारतीय दंड संहिता व महाराष्टÑ ठेवीदार हित संरक्षण कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.पॉन्झी योजना- चार्ल्स पॉन्झी यांनी १९२० मध्ये सर्वात आधी अमेरिकेत गुंतवणूदारांची अशी फसवणूक केली होती.- जगातील कुठलीच योजना वार्षिक सरासरी ८ ते १२ टक्क्यांच्यावर परतावा देऊ शकत नाही. हे गुंतवणूकदारांनी समजून घेण्याची गरज आर्थिक तज्ज्ञांनी यानिमित्ताने व्यक्त केली आहे.
७०३५ कोटींचा घोटाळा! ‘पॅनकार्ड क्लब’चा कारनामा, ५० लाख गुंतवणूकदारांची फसवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2017 11:32 PM