रिझर्व्ह बँकेनं २ हजार रुपयांची नोट चलनातून मागे घेण्याची घोषणा केली असून ती बदलण्यासाठी ग्राहकांना ३० सप्टेंबरपर्यंत वेळ दिला आहे. रिझर्व्ह बँकेच्या या निर्णयानंतर मंगळवार पासून २ हजारांच्या नोटा बदलण्याची मुदत सुरू झाली आहे. काही लोक लवकरात लवकर या नोटा बदलण्याच्या मनस्थितीतही असल्याचं दिसतायत. यामुळे काही जणांकडून २ हजार रुपयांच्या नोटेचा वापर करण्यात येतोय.
याच दरम्यान, फूड डिलिव्हरी ॲप झोमॅटोनं (Zomato) एक मजेदार ट्वीट केलंय. रिझर्व्ह बँकेच्या घोषणेनंतर आता ७२ टक्के ग्राहक कॅश ऑन डिलिव्हरीच्या ऑर्डरचे पैसे २ हजारांच्या नोटेनं करत असल्याचं झोमॅटोनं म्हटलंय. म्हणजेच लोक जेवण ऑर्डर करण्यासोबतच या कमालीच्या ट्रिकनं २ हजारांच्या नोटाही बदलून घेत आहेत. झोमॅटोनं यासंदर्भात एक मजेशीर ट्वीट करत एक फोटो शेअर केलाय.
झोमॅटो सुरू करणार UPI
झोमॅटो आपली UPI सेवा सुरू करणार असल्याचं वृत्त अलिकडेच समोर आलं होतं. यामुळेच ग्राहकांना पेमेंट करणं सोपं होणार आहे. ग्राहकांना पेमेंटची सुविधा सुलभ व्हावी यासाठी कंपनी हे पाऊल उचलणार असल्याचं म्हटलं जातंय. आत्तापर्यंत ग्राहकांकडून झोमॅटोवरील ऑर्डरसाठी Google Pay, PayTm आणि इतर UPI अॅप्सद्वारे पैसे भरावे लागतात. यासाठी त्यांना इतर ॲप्सवर स्विच करावं लागतं. ही प्रक्रिया सुलभ करण्यासाठी झोमॅटो स्वतःचं युपीआय नेटवर्क आणण्याच्या प्रयत्नात आहे.