लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : ‘जी-२०’ देशांच्या वित्तमंत्र्यांनी पुढील महिन्यात धनाढ्य व्यक्तींवर संपत्ती कर लावण्याची तयारी चालविली आहे. एका सर्वेक्षणानुसार, ‘जी-२०’ देशातील ६८ टक्के लोकांनी या प्रस्तावाचे समर्थन केले आहे. विशेष म्हणजे भारतातील ७४ टक्के लोकांचा त्यास पाठिंबा आहे. जागतिक उपासमार, असमानता आणि हवामान बदल या समस्यांचा निपटारा करण्यासाठी हा कर लावला जाणार आहे. ‘अर्थ ४ ऑल इनिशिएटिव्ह अँड ग्लोबल कॉमन्स अलायन्स’ या संस्थेने हे सर्वेक्षण केले आहे. अतिश्रीमंत (सुपर रिच) व्यक्तींवर कर लावण्याच्या प्रस्तावावर २०१३ पासून आंतरराष्ट्रीय समुदायात चर्चा सुरू आहे. जुलैमध्ये होणाऱ्या जी-२० मंत्र्यांच्या बैठकीत या मुद्यावर सहमती बनविण्याचा प्रयत्न ब्राझीलकडून केला जात आहे. या कर प्रस्तावाचे शिल्पकार फ्रेंच अर्थतज्ज्ञ गॅब्रिएल जुकमन हे मंगळवारी या कराचे स्वरूप स्पष्ट करतील.
भारतीयांना हवी हवामानात सुधारणा६८% भारतीयांना हवामान आणि निसर्गात मोठी सुधारणा होण्याची गरज असल्याचे वाटते. ७४% भारतीयांनी अतिश्रीमंतांवरील करास समर्थन दिले आहे. ७६% लोकांना चांगले काम आणि आयुष्यात संतुलन हवे आहे.७१% भारतीय समान बेसिक उत्पन्नाच्या बाजूने आहेत. ८१% भारतीयांनी कल्याणकारी अर्थव्यवस्थांमध्ये बदलाचे समर्थन केले आहे.
...तर अतिश्रीमंतांना द्यावा लागेल २% कर आंतरराष्ट्रीय मानक स्थापन करणे हा या प्रस्तावाचा उद्देश आहे. ताे लागू झाल्यास प्रत्येक देशात अतिश्रीमंत लोकांना आपल्या संपत्तीच्या किमान २ टक्के अतिरिक्त कर द्यावा लागेल.