रेमंड कंपनीचे मालक गौतम सिंघानिया यांनी कुटुंबातील दोन मोठे वाद मिटविले आहेत. वडिलांसोबत असलेला संपत्तीचा वाद त्यांनी काही महिन्यांपू्र्वीच मिटविला होता. परंतू, पत्नी नवाज मोदी सिंघानियासोबत त्यांनी काडीमोड घेण्याचा निर्णय २०२३ मध्ये घेतला होता. नुकतेच नवाज यांनी रेमंडच्या संचालक पदाचा राजीनामा दिला होता. आता यावर मोठी अपडेट येत आहे. नवाज आणि गौतम सिंगानिया पुन्हा एकदा नवरा-बायकोसारखे नांदत आहेत.
फॉर्च्युनने त्यांच्या जवळच्या व्यक्तीच्या हवाल्याने हे वृत्त दिले आहे. गौतम आणि नवाज यांच्यातील जो काही वाद सुरु होता, तो सामोपचाराने मिटविण्यात आला आहे. आता हे दाम्पत्य जेके हाऊसमध्ये पुन्हा एकत्र राहण्यास आले आहे. या दोघांनी एकत्र राहण्याचा निर्णय घेतला आहे.
गौतम सिंघानिया यांनी २०२३ मध्ये नवाजपासून वेगळे होण्याची घोषणा केली होती. ३२ वर्षांचा त्यांचा संसार मोडला होता. निहारिका १९ वर्षांची आणि निशा ११ अशा दोन मुली या दाम्पत्याला आहेत. नवाज यांना ग्रुप कंपन्यांच्या संचालक मंडळातून काढून टाकण्यात आले होते. नुकताच त्यांनी जेके हाऊसमध्ये आल्यावर रेमंडच्या संचालक पदाचा राजीनामा दिला.
या दोघांच्या वादातून गौतम सिंघानिया यांच्या मालमत्तेतील ७५% हिस्सा नवाज यांनी मागितला होता. हे प्रकरण मिटले नसते तर सिंघानियांची ७५ टक्के संपत्ती गेली असती. यापैकी २५ टक्के संपत्ती नवाज यांनी मुलींसाठी मागितली होती. अखेर गौतम सिंघानिया यांनी संसारच नाही तर हजारो कोटींची संपत्तीदेखील या निर्णयामुळे वाचविली आहे. वडिलांसोबतचा वादही त्यांनी मिटविला असून पुन्हा एकदा रेमंड समुह कौटुंबीकदृष्ट्या एक झाल्याचे चित्र आहे. सिंघानिया कुटुंबाने याबाबत काहीही प्रतिक्रिया दिलेली नाही.