Join us

चार्ज लावाल तर यूपीआय बंद ! ७५ टक्के युजर्सचे मत

By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2024 11:50 AM

२०२३-२४ मध्ये १३१ अब्जांहून अधिक यूपीआय व्यवहार

नवी दिल्ली : मागील काही दिवसात पेमेंट करण्यासाठी सर्वांत लोकप्रिय म्हणून यूपीआयचा पर्याय पुढे आला आहे. यूपीआयच्या साहाय्याने पेमेंटवर कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारले जात नसल्याने लोकांनी सोबत रोकड बाळगणे बंद केले आहे; तसेच डेबिट आणि क्रेडिट कार्डाचा वापरही कमी केला आहे; पण यूपीआय व्यवहारांवर शुल्क आकारणी केल्यास देशातील ७५ टक्के युजर्सनी या सुविधेचा वापर बंद करणार, असे मत नोंदवले आहे. प्रत्येक चार जणांमागे केवळ एका व्यक्तीने असे शुल्क भरण्याची तयारी दाखवली आहे. 'लोकल सर्कल' या संस्थेने केलेल्या पाहणीत हे समोर आहे. या पाहणीत नागरिकांच्या पेमेंटच्या पद्धतींबाबत मते जाणून घेण्यात आली. ३८ टक्के युजर्सनी ५० टक्क्यांपेक्षा अधिक देवाणघेवाणीचे व्यवहार डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड किंवा अन्य डिजिटल पेमेंटच्या मार्गांऐवजी यूपीआयच्या साहाय्याने करतात, असे सांगितले.

व्यवहार पहिल्यांदाच १०० अब्जांच्या पार

नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने (एनपीसीआय) दिलेल्या माहितीनुसार २०२३-२४ या वर्षात एकूण यूपीआयद्वारे होणाऱ्या व्यवहारांमध्ये ५७ टक्के वाढ झाली; तर या व्यवहारांच्या मूल्यामध्ये ४४ टक्के वाढ झाली. पहिल्यांदाच यूपीआय व्यवहारांनी १०० अब्जांचा टप्पा पार केला आहे.

२०२३-२४ मध्ये यूपीआयद्वारे होणाऱ्या व्यवहारांची संख्या १३१ अब्जांहून अधिक झाली आहे. २०२२-२३ यूपीआय व्यवहारांची संख्या ८४ अब्जांच्या घरात होती.

यूपीआयद्वारे होणाऱ्या व्यवहारांचे एकूण मूल्य वर्षभरात १,३९,१०० अब्ज रुपयांवरून १,९९,८९० अब्ज रुपयांवर पोहोचले आहे, असे या अहवालात म्हटले आहे.

पाच महिन्यांत ८,६५९ कोटी व्यवहार 

केंद्रीय अर्थ मंत्रालयाने शुक्रवारी माहिती दिली की, २०२४-२५ या आर्थिक वर्षातील पहिल्या पाच महिन्यांमध्ये डिजिटल पेमेंटचे मूल्य वाढून १,६६९ लाख कोटींवर पोहोचले आहे. या काळात डिजिटल व्यवहारांची संख्या वाढून ८,६५९ कोटींवर पोहोचली आहे.

एप्रिल ते ऑगस्ट या पाच महिन्यांत यूपीआय व्यवहारांचे मूल्य १०१ लाख कोटी रुपयांपेक्षा अधिक झाले आहे. २०१७-१८ मध्ये यूपीआय व्यवहारांची संख्या ९२ कोटी इतकी होती. २०२३- २४ या आर्थिक वर्षात व्यवहारांची संख्या १२९ टक्के वाढून १३,११६ कोटींवर पोहोचली आहे. 

सध्या यूपीआयद्वारे सात देशांत मध्ये आर्थिक व्यवहार करता येतात. यूएई, सिंगापूर, भूतान, नेपाळ, श्रीलंका, फ्रान्स आणि मॉरीशस या देशांमध्ये असे व्यवहार करता येतात. या सेवेचा आणखी देशांमध्ये विस्तार केला जाणार आहे.

किती जणांचा सहभाग?

या पाहणीत देशभरातील ३०८ जिल्ह्यांमधील तब्बल ४२,००० जणांनी आपली मते नोंदवली. यूपीआय व्यवहारांबाबत या पाहणीमध्ये सहभागींनी १५,५९८ प्रतिक्रिया नोंदविल्या ऑनलाइन स क्षण १५ ते २० सप्टेंबर या काळात करण्यात आले.

टॅग्स :व्यवसाय