नवी दिल्ली : यंदाच्या गळीत हंगामातील पहिल्या तीन महिन्यांत (आॅक्टोबर-डिसेंबर) साखरेचे उत्पादन ७९.८ लाख टन झाले आहे, अशी माहिती भारतीय साखर उद्योग संघाने (इस्मा) दिली. साखर उत्पादनात प्रमुख असलेल्या महाराष्ट्रात या अवधीत ३३.७ लाख टन उत्पादन झाले आहे. महाराष्ट्रात मागच्या वर्षी याच अवधीत ३२.६ लाख टन साखरेचे उत्पादन झाले होते.मागच्या वर्षी याच अवधीत साखरेचे उत्पादन ७४.९ लाख टन झाले होते. त्या तुलनेत यंदाच्या हंगामातील पहिल्या तीन महिन्यांत साखरेचे उत्पादन ६.५ टक्क्यांनी वाढले आहे. साखर उत्पादनात दुसरा क्रमांक असलेल्या उत्तर प्रदेशात या अवधीत १८.३ लाख टन साखरेचे उत्पादन झाले आहे. कर्नाटकात १५.५ लाख टन, गुजरातमध्ये ४,४०,००० टन उत्पादन झाले आहे.आंध्र प्रदेश आणि तेलंगणात या हंगामातील पहिल्या तीन महिन्यांत अनुक्रमे ४१ हजार टन आणि २ लाख १५ हजार टन उत्पादन झाले आहे. तसेच तामिळनाडूत ८० हजार टन, बिहारमध्ये १ लाख ४० हजार टन, हरियाणात १ लाख टन, पंजाबात ९५ हजार टन, उत्तराखंडमध्ये ७० हजार टन आणि मध्यप्रदेशात ७५ हजार टन साखरेचे उत्पादन झाले आहे. साखर कारखान्यांनी आजच्या तारखेपर्यंत जवळपास ८ लाख टन साखर निर्यातीचे करार केले आहेत.भारतात उसाला अधिक भाव आहे, तर जागतिक पातळीवर दर कमी असल्याने कच्च्या साखरेच्या निर्यातीत समानता नाही. भारतातील साखर कारखान्यांनी केलेले कच्च्या साखरेचे उत्पादन नगण्य आहे. आॅक्टोबर- नोव्हेंबर २०१५ मध्ये साखरेचा भाव २७ ते २८ रुपये प्रति किलोहोता.
डिसेंबरपर्यंत ७९.८ लाख टन साखरेचे उत्पादन
By admin | Published: January 05, 2016 11:46 PM