नवी दिल्ली : पेन्शनधारकांसाठी (Pensioners) मोठी दिलासादायक बातमी आहे. जर तुम्हाला किंवा तुमच्या घरातील कोणाला केंद्र सरकारकडून पेन्शनची (Central Government Pensioner) सुविधा मिळत असेल तर सरकारने तुमच्यासाठी मोठी घोषणा केली आहे.
केंद्र सरकारच्या (Central Government) पर्सनल डिपार्टमेंटने पेन्शन देणाऱ्या बँकांना सांगितले आहे की, पेन्शनधारकांची पेन्शन स्लिप त्यांच्या मोबाईल नंबर, एसएमएस किंवा ईमेलद्वारे पाठवावे, जेणेकरून कोणालाही त्रास होऊ नये. यासाठी बँका पेन्शनधारकांचा मोबाइल नंबरचा वापर करू शकतात.
दरम्यान, देशातील सुमारे 62 लाख पेन्शनधारकांना केंद्र सरकारच्या या सुविधेचा लाभ मिळणार आहे कारण, त्यांना पेन्शन स्लिपसाठी विभागात जावे लागणार नाही. आता पेन्शन स्लिप त्यांच्या मोबाइलवरच सहज उपलब्ध होईल.
सोशल मीडियाचाही करू शकता वापरसरकारने पेन्शनधारकांच्या ईज ऑफ लिव्हिंग (Ease of Living) अंतर्गत ही सेवा देण्याचे म्हटले आहे. याशिवाय, व्हॉट्सअॅपसारख्या (WhatsApp) सोशल मीडिया टूल्सचा वापरही करता येईल, असा आदेश बँकांना देण्यात आला आहे.
आदेशात सरकारने काय म्हटले आहे?सरकारने जारी केलेल्या आदेशानुसार, पेन्शनधारकांच्या खात्यात पेन्शन जमा झाल्यानंतर बँका एसएमएस किंवा ईमेलद्वारे पेन्शन स्लिप पाठवू शकतात. पेन्शनधारकाचा मोबाईल नंबर व्हॉट्सअॅपवर असल्यास त्यावरही पेन्शन स्लिपही पाठवू शकता.
मंत्रालयाने म्हटले आहे की, दरमहा पेन्शन स्लिपमध्ये पेन्शनची रक्कम आणि कर कपातीचा उल्लेख केला पाहिजे. केंद्राने बँकांना हे काम कल्याणकारी उपक्रम म्हणून पूर्ण करण्यास सांगितले आहे, कारण याचा संबंध आयकर, महागाई सवलत, महागाई सवलतीच्या थकबाकीशी आहे. पेन्शनधारकांसाठी जीवनमान सुलभ करावे आणि मोबाईल एसएमएस, ई-मेल व व्हॉट्सअॅपचा वापर करावा, असे केंद्राने बँकांना सांगितले आहे.