नवी दिल्ली : केंद्रीय कर्मचाऱ्यांना लवकरच सरकारकडून आनंदाची बातमी मिळणार आहे. कर्मचाऱ्यांसाठी ही बातमी महागाई भत्ता (डीए) वाढीसंदर्भात आहे. सप्टेंबर महिन्यात महागाई भत्ता जाहीर होण्याची शक्यता असल्याचा दावा मीडिया रिपोर्टमध्ये करण्यात आला आहे. मात्र, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. यावेळी महागाई भत्त्यात ३ टक्क्यांनी वाढ अपेक्षित आहे. यानंतर महागाई भत्ता सध्याच्या ४२ टक्क्यांवरून ४५ टक्के होईल.
अलीकडे पीटीआयच्या एका रिपोर्टमध्ये असा दावा करण्यात आला होता की, केंद्र सरकार आपल्या एक कोटींहून अधिक कर्मचारी आणि पेन्शनधारकांच्या डीए/डीआरमध्ये ४५ टक्के वाढ करण्याचा विचार करत आहे. दरम्यान, केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी डीए/डीआरचा (DA/DR) दर प्रत्येक महिन्याला कामगार मंत्रालयाने जारी केलेल्या AICPI निर्देशांकाच्या आधारे ठरवला जातो.
दरम्यान, ३१ जुलै रोजी कामगार मंत्रालयाने जाहीर केलेले जून CPI-IW आकडे ३ टक्क्यांपेक्षा थोडे जास्त आहेत. दशांश बिंदूचा सरकार विचार करत नाही. ऑल इंडिया रेल्वेमेन्स फेडरेशनचे सरचिटणीस शिव गोपाल मिश्रा यांनीही यावेळी डीए ४ टक्क्यांनी वाढवण्याची मागणी केली जात असल्याचे सांगितले होते. मात्र सरकार त्यात ३ टक्क्यांनी वाढ करून ४५ टक्के करण्यात येईल अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.
१ जुलैपासून लागू होईल
सरकारने सप्टेंबरमध्ये डीए आणि डीआरमध्ये वाढ केल्यास १ जुलैपासून लागू केला जाईल. पहिल्यांदा अर्थ मंत्रालयाचा खर्च विभाग महसुली परिणामांसह डीएमध्ये वाढ करण्याचा प्रस्ताव तयार केला जाईल. त्यानंतर हा प्रस्ताव केंद्रीय मंत्रिमंडळासमोर मंजुरीसाठी ठेवला जाईल. मंत्रिमंडळाच्या मंजुरीनंतर १ जुलै २०२३ पासून ते लागू केले जाईल. सध्या केंद्र सरकारचे एक कोटीहून अधिक कर्मचारी आणि पेन्शनधारक आहेत. सध्या त्याला मूळ वेतन/पेन्शनच्या ४२ टक्के दराने डीए/डीआर मिळत आहे.