नवी दिल्ली : केंद्र सरकारच्या जवळपास ५० लाख कर्मचारी आणि ६५ लाख पेन्शनधारकांसाठी आनंदाची बातमी आहे. देशात वाढत्या महागाईदरम्यान मोठा दिलासा मिळू शकतो. सरकार एक जुलैपासून महागाई भत्त्यात वाढ करण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
सरकार यावेळी महागाई भत्त्यात (Dearness Allowance Hike) ४ टक्के वाढ करण्याची शक्यता आहे. जर ही वाढ केली तर महागाई भत्ता ३४ टक्क्यावरून ३८ टक्के होईल. मार्चमध्ये AICPI Index मध्ये १ अंकाने वाढला होता. तो १२६ अंकांवर पोहोचला होता.
दरम्यान, सरकारने मार्चमध्येच महागाई भत्त्यात वाढ केली होती. मात्र एप्रिल, मे आणि जून २०२२ साठी AICPI चे नंबर येणे बाकी आहे. जर हे मार्चच्या पातळीच्या वर राहिले तर सरकार महागाई भत्ता वाढवू शकतो.
देशात महागाई मोठ्या प्रमाणात वाढली आहे. एप्रिलमध्ये किरकोळ महागाईचा दर (Retail Inflation Rate) ७.७९% च्या विक्रमी उच्चांकावर पोहोचला. तर अन्नधान्य महागाईचा दर ८.३८ टक्के राहिला. महागाईचा हा दर गेल्या ८ वर्षांच्या उच्च पातळीवर आहे.
केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना जून २०१७ पासून ७ व्या वेतन आयोगाचा (7th Pay Commission) लाभ मिळतो. अशा स्थितीत महागाई भत्ता ३८ टक्क्यांपर्यंत वाढल्यास केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ होऊ शकते.
एका अंदाजानुसार, जर एखाद्या कर्मचाऱ्याचे मूळ वेतन १८,००० रुपये असेल, तर त्याचा ३४ टक्के दराने महागाई भत्ता ६,१२० रुपये होतो. आता जर तो ३८ टक्के झाला तर कर्मचार्यांना ६,८४० रुपये महागाई भत्ता मिळेल. अशाप्रकारे त्याला वार्षिक ८,६४० रुपये अधिक वेतन मिळेल. सातव्या वेतन आयोगाअंतर्गत कर्मचाऱ्यांचे किमान मूळ वेतन १८,००० रुपये आहे.