पीएफ खातेधारकांना मोठी भेट देताना, कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेनं (EPFO) शनिवारी व्याजदरात वाढ करण्याची घोषणा केली. दरम्यान, ही वाढ गेल्या तीन वर्षातील सर्वाधिक वाढ आहे आणि पीएफचा व्याजदर आता ८.२५ टक्के करण्यात आला. निवडणूक वर्षात पीएफवरील व्याजात वाढ झाल्यानंतर आता महागाई भत्त्यात (DA Hike) लवकरच वाढ अपेक्षित आहे. मीडिया रिपोर्ट्सनुलार सरकार मार्च २०२४ मध्ये यावर मोठा निर्णय घेऊ शकते. असं झाल्यास केंद्रीय कर्मचाऱ्यांना देण्यात येणारा डीए ५० टक्के होईल.
DA वाढीची अपेक्षा वाढली
EPFO च्या केंद्रीय विश्वस्त मंडळानं (CBT) २०२३-२४ या आर्थिक वर्षासाठी कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (EPF) खात्यासाठी नवीन व्याजदर जाहीर केला आहे. ईपीएफओनं देशातील सुमारे ७ कोटी कर्मचाऱ्यांना भेट दिली असून व्याजदर वाढवून ८.२५ टक्के केली आहे. पीटीआयनुसार, पीएफ खातेधारकांना आता पूर्वीपेक्षा ०.१० टक्के जास्त व्याज मिळणार आहे. गेल्या वर्षी २८ मार्च रोजी ईपीओएफओनं २०२२-२३ साठी कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (EPF) खात्यांसाठी ८.१५ टक्के व्याजदर जाहीर केला होता. पीएफ व्याजदरात वाढ झाल्यानं केंद्रीय कर्मचाऱ्यांमध्येही डीए वाढीची अपेक्षा वाढली आहे.
सरकार कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वर्षातून दोनदा वाढवते आणि जानेवारी-जून सहामाहीसाठी डीए वाढ मार्च २०२४ मध्ये जाहीर होण्याची अपेक्षा आहे. काही रिपोर्ट्सनुसार, यावेळी सरकार निवडणुकीपूर्वी केंद्रीय कर्मचाऱ्यांना ४ टक्के डीए वाढीची भेट देऊ शकते आणि पुढील महिन्यात त्याची घोषणा केली जाऊ शकते.
विविध रिपोर्ट्सच्या आधारे ही अपेक्षा व्यक्त केली जात आहे, तर सरकारकडून यासंदर्भात अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. मात्र डीएमध्ये ४ टक्के वाढ झाल्यास कर्मचाऱ्यांच्या पगारात बंपर वाढ होणार आहे. सध्या केंद्रीय कर्मचाऱ्यांचा डीए ४६ टक्के आहे, तो वाढवून ५० टक्के केला जाऊ शकतो.
एचआरमध्येही वाढ शक्य
एकीकडे केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात ४ टक्के वाढ अपेक्षित आहे आणि तसं झाल्यास १ जानेवारी २०२४ पासून कर्मचाऱ्यांना त्याचा लाभ मिळेल. यासोबतच जेव्हा महागाई भत्ता ५० टक्क्यांवर पोहोचेल तेव्हा कर्मचाऱ्यांना दिल्या जाणाऱ्या हाऊस रेंट अलाऊन्समध्येही वाढ होऊ शकते. जुलै २०२१ मध्ये, जेव्हा डीए २५ टक्क्यांच्या पुढे गेला, तेव्हा एचआरएमध्ये ३ टक्क्यांची वाढ दिसून आली आणि तो वाढवून २७ टक्के करण्यात आला. अशा परिस्थितीत, डीए ५० टक्के असताना पुन्हा एकदा एचआरए वाढ अपेक्षित आहे आणि जर अहवालांवर विश्वास ठेवला तर तो ३० टक्क्यांपर्यंत वाढवला जाऊ शकतो.